Badlapur Crime : बदलापूरमध्ये मित्राच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्याला महिलेच्या पतीने डोक्यात हातोडीचे वार करुन ठार केलं आहे. बदलापूरमध्ये एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. तसंच ही बाब पतीला सांगितलीस तर तुला ठार करेन, तुझ्या पतीलाही ठार करेन अशी धमकी दिली. त्यानंतरही हा प्रकार घडला. त्यामुळे घडल्याने पत्नीने पतीला सगळा प्रकार सांगितला. हा प्रकार समजल्यानंतर मित्राने मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली. त्यानंतर तो बाथरुममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या पतीला अटक केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी तिला दिली. यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र पत्नीने हिंमत करून नरेश याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली. यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत १० जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं. त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला. पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडीचे वार केले आणि त्याची हत्या केली आणि अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी हे देखील सांगितलं की सुरुवातीला नरेशने मित्र बाथरुममध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं होतं.
हे पण वाचा- Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण
पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीला केली अटक
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र ज्यावेळेस सुशांत याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, त्यावेळेस नरेशने रचलेला बनाव उघड झाला.कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच सुशांत याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. सुशांतने माझ्या पत्नीवर बलात्कार केल्याने त्या रागातून सुशांतला मारल्याचं नरेशने पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.