Badlapur Crime : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींचं लैंगिक शोषण (Badlapur Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर बदलापूरमधलं वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं आहे. बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल रोको केला. तसंच शहरभर आंदोलन केलं. याचप्रमाणे ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल हे आश्वासनही दिलं आहे. अशात ज्या शाळेची तोडोफोड करण्यात आली त्या शाळेच्या अध्यक्षांनी हात जोडत शाळेची तोडफोड करु नका अशी विनंती केली आहे.
शाळेचे अध्यक्ष काय म्हणाले?
शाळेच्या अध्यक्षांनी आंदोलकांना शांत होण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले की, गेल्या आठवड्यात शाळेत जी घटना घडली ती निंदनीय आणि घृणास्पद ( Badlapur Crime ) आहे. आम्ही पोलिसांना जास्तीत जास्त सहकार्य करत आहोत. प्रशासन आणि मुलीच्या पालकांनाही आम्ही सहकार्य करतोय. तसेच आमच्या शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित कशा करता येतील, याचा विचार करत आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की, तुम्ही कुठल्यातरी गोष्टीचा ( Badlapur Crime ) राग या शाळेवर काढू नका. तुम्ही पण याच शाळेत शिकला आहात, मी पण… हे वाक्य बोलताना शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला. या नंतर त्यांना बोलता आले नाही आणि त्यांनी डोळ्याला रुमाल लावत तेथून काढता पाय घेतला. शाळेचे अध्यक्ष जय कोतवाल यांनी हात जोडून तोडफोड न करण्याची विनंती केली आहे.
हे पण वाचा- Badlapur School Case : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचार; स्थानिकांचा उद्रेक, नेमकं काय आहे प्रकरण?
आज सकाळपासूनच बदलापूर बंदची हाक
दोन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात ( Badlapur Crime ) आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. तेव्हापासून नागरिकांचा मोठा जमाव शाळेबाहेर जमला होता. मात्र, याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या एका पथकाने हा जमाव रोखून धरला होता. मात्र, काहीवेळापूर्वीच आंदोलकांच्या जमावापैकी काहीजण पोलिसांच्या सुरक्षेचे कडं भेदून आतमध्ये शिरले. या आंदोलकांनी शाळेत तोडफोड आणि नासधूस केली.
काही आंदोलकांनी पेट्रोल आणलं होते, हे पेट्रोल ओतून शाळेत आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी शाळेच्या परिसरात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या शाळेच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेच्या आणि बदलापूर स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात येते आहे.