बदलापूर: बदलापूर पूर्वेतील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमधून बुधवारी रात्रीच्या सुमारास रासायनिक वायू सोडण्याचा संशय व्यक्त होतो आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास खरवई, शिरगाव, दत्तवाडी या भागात सर्वत्र रासायनिक दूर पसरला होता. अनेक रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवला. त्यामुळे ही वायू गळती की पुन्हा एखाद्या कंपनीने रासायनिक वायू सोडला का असा संशय व्यक्त होत होता. विशेष म्हणजे एरवी हवेचा गुणवत्ता निर्देशांक बदलापूर दीडशे पर्यंत असतो बुधवारी रात्रीच्या सुमारास हा निर्देशांक ३१४ पर्यंत पोहोचला होता.

हेही वाचा : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर

बदलापूर शहराच्या पूर्व भागात खरवई ते शिरगाव औद्योगिक वसाहत पसरली आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या कंपन्यांमधून अनेकदा रासायनिक वायू सोडण्याच्या तक्रारी आसपासचे रहिवासी करतात. हिवाळ्यात रासायनिक वायूचा हा त्रास अधिक जाणवतो. यंदाच्या वर्षात बुधवारी या रासायनिक वायूचा सर्वाधिक त्रास औद्योगिक वसाहती शेजारच्या रहिवाशांना आणि इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाणवला. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास खरवई, शिरगाव, दत्तवाडी या औद्योगिक वसाहती शेजारच्या परिसरामध्ये रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवला. बदलापूर कर्जत राज्यमार्गावर धुके पसरल्यासारखी परिस्थिती होती. सर्वत्र रासायनिक वायू पसरल्याचे जाणवत होते. नेमका कोणत्या कंपनीतून हा रासायनिक वायू सोडला गेला हे मात्र कळू शकले नाही. मात्र यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. येथील कंपन्या सातत्याने रासायनिक वायू सोडत असतात, असा आरोप सातत्याने होतो. हिवाळ्यात वारा थांबल्याने हा वायू त्या जागेवर थांबून राहतो. त्यामुळे त्याचा त्रास अधिक जाणवतो, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. बदलापुरात एरवी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५० पर्यंत असतो. रात्री १० नंतर अनेकदा कंपन्यातून रासायनिक वायू सोडला जातो. त्यावेळी हा निर्देशांक तीनशे पर्यंत पोहोचतो, अशीही माहिती मोडक यांनी दिली आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हवेचा हा निर्देशांक ३१४ इतका होता. त्यामुळे बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील अशा बेजबाबदार कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होते आहे.

Story img Loader