बदलापूर : बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांना कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई आणि थेट मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कांजुरमार्ग बदलापूर मेट्रो १४ मार्गाला लवकरच गती मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून खासगी नागरिक भागीदारीतून या मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे. बदलापूर स्थानक परिसरातील कोंडी फोडण्यासाठी आवश्यक अशा सॅटिस प्रकल्पाला आणि शहरातल्या नव्या उड्डाणपुलालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे प्रवास सुखकर होण्यासाठी मदत होणार आहे.
कल्याण तळोजा मेट्रो मार्ग थेट बेलापूरपर्यंत जोडण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. मेट्रो 12 मार्गाचे उभारणीची निविदा जाहीर झाली असली तरी कांजुरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 मार्गाला गती मिळत नव्हती. मात्र नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत मेट्रो 14 मार्गाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या मागणीनुसार आयोजित बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मेट्रो 14 या मार्गाची उभारणी खाजगी नागरी भागीदारीतून करण्याला हिरवा कंदील दिल्याची माहिती कथोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमध्ये खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई
मेट्रो 14 ठाणे – भिवंडी – कल्याण आणि नवी मुंबई, कांजुरमार्ग आणि मुंबई या मेट्रो मार्गांना जोडणार आहे. त्यामुळे या मार्गाची उभारणी वेगाने व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र गेल्या काही वर्षात या मेट्रो मार्गासाठी निधीची तरतूद केली जात नव्हती. मात्र आता खाजगी नागरी भागीदारीतून मेट्रो मार्गाच्या उभारणीला मंजुरी दिल्याने या मेट्रो मार्गाला गती मिळणार आहे. बदलापूर शहरात मेट्रो मार्गासाठी आणि यार्डाच्या उभारणीसाठी आवश्यक जागा यापूर्वीच प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गाच्या उभारणीतील अडथळे कमी झाले आहेत.
बदलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येला सध्या अस्तित्वात असलेला एकमेव उड्डाणपूल अपुरा पडतो आहे. त्यामुळे बदलापूर शहरात नवीन उद्योग उड्डाणपूल असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बदलापूर पूर्वेतील कार्मेल शाळा ते पश्चिम येथील तलाव परिसरात उड्डाणपूल उभारणीला मंजुरी देण्यात आली होती. कोविड संकटात आर्थिक परिस्थिती पाहता काही प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली होती. या प्रकल्पामध्ये बदलापूरच्या उड्डाणपुलाचाही समावेश होता. त्यामुळे उड्डाणपूलाचे काम रखडले होते. अखेर या उड्डाणपुलाच्या कामालाही नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
सॅटिस प्रकल्प मार्गी लागणार
बदलापूर शहराचा मध्यवर्ती केंद्र असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी फोडण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या स्थानक परिसर वाहतूक व्यवस्थापन प्रकल्प अर्थात सॅटिस प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने सॅटिस प्रकल्प सभागृहात मंजूर केला होता. एमएमआरडीएच्या माध्यमातून यासाठी निधी मिळावा अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती. यासाठीच प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निधी द्यावा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली. त्यानुसार सॅटिसच्या उभारणीसाठीचा १०० टक्के निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे कथोरे यांनी सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी सॅटिस उभारणीसाठी आवश्यक आराखडा तयार करण्यासाठी संस्थांना आवाहन करण्यात आले होते. त्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे.