बदलापूर : पालिकेतून दस्त गहाळ होणे, वेळीच उपलब्ध न होणे, कर्मचारी किंवा अधिकारी जागेवर नसणे अशा कामकाजातील दिरंगाईची कारणे आता बंद होणार आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने कामाकजातील सुसुत्रतेसाठी १०० टक्के ई कार्यालय प्रणाली राबवली आहे. त्यामुळे दस्तऐवजांचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम प्रायोगित तत्वावर सुरू होते. आता एका क्लिकवर सर्व कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत.

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत कुळगांव बदलापूर नगर पालिकेने ई-कार्यालयाची १०० टक्के अंमलबजावणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. पालिकेने पारंपरिक कागदी प्रणालीला पर्याय म्हणून “ई- कार्यालय” हा नवा डिजिटल मार्ग अवलंबला आहे. या उपक्रमामुळे नगरपालिका प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि डिजिटल बनण्यास मदत होणार आहे. शासनाच्या कामकाजात सुधारणा आणण्यासाठी तसेच नागरिकांना अधिक प्रभावी आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या ई कार्यालय प्रणालीमुळे फाईलींचे वहनही वेगाने होण्याची आशआ आहे. तसेच कागदी कामकाजावर अवलंबून राहण्याची आवश्यकता संपली आहे, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे.

विविध विभागांमधील दस्तऐवज व माहिती आता ऑनलाइन व्यवस्थापित केली जात आहे, ज्यामुळे कार्यप्रवाह अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक झाला आहे. दस्तऐवज गहाळ होणे, दस्तऐवज उपलब्ध नसणे, अधिकारी कर्मचारी जागेवर नसताना फाईल न सापडणे, ठेकेदार किंवा अधिकारी, कर्मचारी यांच्या बदलीनंतर ती फाईल शोधण्यास विलंब लागणे अशा सर्व समस्यांवर आता ई कार्यालय प्रणाली फायदेशीर ठरण्याची आशा आहे. सर्व कागदपत्रांचा मागोवा घेणे सोपे झाले असून एका क्लीकवर हवे असलेले दस्तावेज उपलब्ध होणार आहेत. तसेच हे सर्व दस्तावेज सुरक्षित साठवले जाणार आहेत.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

सर्व कर्मचाऱ्यांचे शासकीय मेल आयडी कार्यान्वयित करून प्रत्येकाचे स्वतंत्र अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. ई-ऑफिस सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नागरिकांना कमी वेळात अधिकाधिक सेवा जलद गतीने देणे शक्य होणार आहे, असे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले आहे.