बदलापूरः मालमत्ता कर वसुलीसाठी विविध आक्रमक निर्णय घेणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेला मागणीच्या ९० टक्के करवसुली करण्यात यश आले आहे. पालिका प्रशासनाने या काळात १११ मालमत्ता जप्तही केल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात करवसुलीत ५६ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर यापुढेही कारवाई सुरू राहील असे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी यंदाच्या वर्षात मालमत्ता कराची १००टक्के वसुली करण्याचे आदेश दिले होते. बदलापुरात एकूण १लाख ३६ हजार ६७८ इतके मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी १ लाख २१ हजार ६७१ मालमत्ता निवासी, १४ हजार ३६५ मालमत्ता वाणिज्य आणि ६४२ मालमत्ता औद्योगिक आहेत. त्यानुसार नगरपालिकेची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील एकूण मागणी ७७ कोटी ३४ लाख इतकी आहे. नगरपालिकेने ३१ मार्च २०२५ अखेर ७० कोटी १३ लाख इतकी वसुली केली आहे. म्हणजेच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पालिका प्रशासनाने एकूण ९०.६ टक्के कर वसुली केली आहे. यात ऑनलाईन पद्धतीने एकूण १६ कोटी ४५ लाख रूपये वसूल करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. गेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात नगरपालिकेमार्फत ४५ कोटी कर वसुली करण्यात आली होती. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २५ कोटी १३ लाखांची जादा रक्कमेची वसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची करवसुली ५६ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी थकबाकीदारांची नावे थेट बॅनरच्या माध्यमातून चौकाचौकात लावण्यात आली होती.
मालमत्तांची जप्ती
कर वसुली करत असताना पालिका प्रशासनाने २७ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान पालिकेने ८ भरारी पथकांची स्थापना केली होती. या पथकांमार्फत थकीत मालमत्ता कर धारकांच्या मालमत्ता जप्त करणे किवा अटकावणी करण्याची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी १११ मालमत्तांची जप्ती केली असून थकीत मालमत्ता कराच्या रक्कमे एवढ्या किमतीच्या मालमत्तांची अटकावणी करण्यात आली आहे. तसेच भरारी पथकांद्वारे १० कोटी ३६ लाख ९३ हजार ९५३ रूपये इतकी वसुली करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्षात देखील मालमत्ता कर वसुलीची व जप्तीची मोहीम सुरु राहणार आहे. ज्या मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर थकीत आहे त्यांनी थकीत मालमत्ता कराची रक्कम नगरपालिकेकडे तात्काळ भरणा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असेही पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी सांगितले आहे.