बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होते आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची लगबग पाहायला मिळत होती. कर्मचारी, अधिकारी आपापल्या दालनांमध्ये सजावट आणि इतर व्यवस्था पाहत होते. तर काही अधिकारी आपली केबिन याबाबत निवड करताना दिसत होते. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे प्रशासकीय कार्यालय गुरुवारपासून पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील नव्या कार्यालयात स्थलांतरित होणार आहे. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे लोकार्पण होईल. या निमित्ताने बुधवारी सायंकाळी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी आणि कार्यक्रम आयोजनात आघाडीवर असलेले शिवसेनेचे वामन म्हात्रे यांची लगबग पाहायला मिळाली. वेगवेगळ्या मजल्यांवर अधिकारी आपापल्या विभागात दालनांची व्यवस्था पाहात होते. कर्मचारी आसन व्यवस्था, खुर्च्या लावणे, प्रवेशद्वार सजवणे अशा गोष्टी करताना दिसत होते. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आपापली दालने व्यवस्थित आणि टापटीप राहतील याची काळजी घेताना दिसले. गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन करत पाहणी करतील. त्यामुळे त्यावेळी कोणतीही त्रुटी दिसणार नाही याची खबरदारी घेताना अधिकारी दिसत होते.

हेही वाचा : राष्ट्रवादीचे खासदार म्हणतात, “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे”

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे कामकाज गेली २४ वर्ष एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या इमारतीतून चालत होते. अतिशय अरुंद आणि कोंदट वातावरणात कर्मचारी आणि अधिकारी काम करत होते. अनेकदा गळती, पुरेशी जागा नसल्याने अनेक विभागांचा कारभार सभागृहातून चालायचा. तर नगररचना, अग्निशमन आणि इतर काही विभाग इतर इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. आता नव्या इमारतीत एकाच ठिकाणी संपूर्ण शहराचा कारभार चालेल. ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगर पालिकांच्या तुलनेत कुळगाव बदलापूर पालिकेची इमारत प्रशस्त आणि भव्य आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद पाहायला मिळत होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur municipal council administration new building inauguration of independence day css