बदलापूरः गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात शहर सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण आणि प्रवेशद्वार तसेच आसनांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. चार वर्षात चौक सुशोभीकरणासाठी ५ कोटींचा, तर शहरभर वाटण्यासाठी आसने यासाठी १.८३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. दुसरीकडे शहरातील स्वागत कमानींसाठी २ कोटींचा खर्च करण्यात आल्याची बाब अंदाजपत्रकातून समोर आली आहे. विशेष म्हणजे या कामांसाठी आणखी लाखो रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुळगाव बदलापूर नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू होऊन लवकरच पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. ऐन निवडणुकींच्या तयारीत करोनाची टाळेबंदी लागली होती. तेव्हापासून या बदलापुरात प्रशासकीय राजवट आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे २०२५-२६ चे अंदाजपत्रक नुकतेच सादर करण्यात आले. यात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. मात्र त्याचवेळी गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीच्या काळात चार वर्षात स्वागत कमानी, शहरात आसने (बेंचेस) बसवणे, शहर आणि मुख्य चौक सुशोभीकरण अशा कामांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी शहरातील प्रवेशद्वार आणि स्वागत कमानींच्या उभारणीसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच प्रवेशद्वार आणि स्वागत कमानींसाठी आर्थिक वर्ष २०२१ – २२ वर्षात १ कोटी २८ लाख ३० हजार १३६ रूपये, २०२२ – २३ वर्षात ३३ लाख ३७ हजार ८८१, २०२४-२५ वर्षात ४० लाख रूपये अर्थात चार वर्षात २ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

शहर आणि मुख्य चौक सुशोभीकरणाच्या संबंधित कामांसाठी गेल्या चार वर्षात ५ कोटी ८० लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. तर यंदाच्या आर्थिक वर्षातही १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात २०२१-२२ वर्षात २ कोटी २२ लाख ३९ हजार ४३१, तर २०२२-२३ या वर्षात ६५ लाख ०५ हजार ७६२, २०२३-२४ वर्षात १ कोटी ४२ लाख ७८ हजार ९५६ आणि २०२४-२५ वर्षात १ कोटी ५० लाख रूपये खर्च झाले आहेत. त्याचवेळी शहरात गेल्या चार वर्षात आसने (बेंचेस) लावण्याच्या कामातही १ कोटी ८३ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. २०२१-२२ वर्षात ११ लाख ४३ हजार २५१, २०२२- २३ वर्षात ६३ लाख ३२ हजार ९१२, २०२३ -२४ वर्षात ७८ लाख ५२ हजार १२२ तर २०२४- २५ वर्षात ३० लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षातही ५० लाखांची आसने बसवली जाणार आहेत. हे सर्व आकडे पाहून नागरिकांची डोळे चक्रावले असून या खर्चाचा फायदा किती असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.