Badlapur Protest Over School girls Sexual Assault Case : बदलापूरच्या आदर्श शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर (वय चार वर्षे व सहा वर्षे) अत्याचार केल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मागील १० तासांपासून हजारो नागरिक रेल्वे स्टेशन व आदर्श शाळेबाहेर आंदोलन करत आहेत. मुलींच्या पालकांनी शाळेकडे तक्रार केल्यानंतर शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व संचालकांनी अनेक दिवस या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं नाही. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. परिणामी बदलापूरकर रस्त्यावर उतरले. त्यांनी सकाळपासून मुंबई लोकल व एक्सप्रेस सेवा बंद ठेवली आहे, तसेच शाळातेही तोडफोड केली आहे. दरम्यान, मुंबईत येणाऱ्या व मुंबईहून निघणाऱ्या मेल व एक्सप्रेसवर या आंदोलनाचा परिणाम झाला आहे. तसेच मुंबई लोकल सेवा देखील खोळंबली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या लोकल गाड्या सध्या अंबरनाथपर्यंत चालवल्या जात आहेत. अंबरनाथ ते कर्जत, खोपोलीला जाणारी लोकलसेवा बंद आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसाऱ्याला जाणारी लोकलसेवा काही मिनिटे उशिराने चालू आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने बदलापूरवरून ये-जा करणाऱ्या १० मेल व एक्सप्रेस कर्जत, पनवेल ठाणे स्थानकांवरून वळवल्या आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरवरून जाणाऱ्या १० मेल एक्सप्रेस कर्जत, पनवेल किंवा ठाणे स्थानकांवरून वळवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा > “शक्यच नाही अशी मागणी आंदोलकांनी करू नये”, गिरीश महाजनांची भूमिका; म्हणाले, “कायद्यानं चालावं लागेल”!

वळवण्यात आलेल्या गाड्यांची यादी

22160 – चेन्नई – मुंबई एक्सप्रेस
22731 – हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस
22226 – सुरत – मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वंदे भारत एक्सप्रेस
11014 – कोईंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
14805 – यशवंतपूर – बार्मेर एसी एक्सप्रेस
22159 – मुंबई – चेन्नई एक्सप्रेस
12263 – पुणे – निजामुद्दीन एक्सप्रेस
22225 – मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

बदलापूर स्थानकातील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मंत्री गिरीश महाजन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतरही आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. अखेर १० तास रेल्वेचा खोळंबा झाल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षकांनी अधिक पोलीसफाटा बोलावल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी सहा वाजता आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर जमाव पांगला. त्यामुळे रेल्वे ट्रॅक मोकळे होत आहेत. काही वेळातच बदलापूरमार्गे लोकल व मेल-एक्सप्रेस सेवा सुरू होऊ शकते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur protest sexual assault case mumbai local mail express diversion via panvel karjat asc