सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या आयुष्याचा शिधा पुरविणाऱ्या शिधावाटप कार्यालयांनाच आता ‘दुरुस्तीचा शिधा’ पुरविण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ, बदलापूरमधील शिधावाटप कार्यालयांची अवस्था तर अत्यंत दयनीय असून, त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. बदलापुरातील २५ वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या कार्यालयाचे छप्पर, जिना मोडकळीस आला आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेरील साधा फलकही बदललेला नाही, असे दयनीय चित्र आहे.
बदलापुरातील या शिधावाटप कार्यालयाचे २६ जुलै २००५च्या भीषण जलप्रलयात मोठे नुकसान झाले. त्यावेळी थोडीफार डागडुजी करण्यात आली. मात्र पूर्णपणे लक्ष न दिल्याने अत्यंत दयनीय अवस्थेत हे कार्यालय उभे आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. किमान ५० हजार शिधापत्रिकाधारकांचे काम या कार्यालयातून चालते. त्यांना सेवा देण्यासाठी हे २५ वर्षांपूर्वीचे मोडकळीस आलेले कार्यालय अपुरे पडत आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कार्यालयात सध्या १३ कर्मचारी असून अनेक पाच पदे रिक्त आहेत.
अंबरनाथ येथील कार्यालयाचीही हीच अवस्था आहे. चार बैठय़ा खोल्यांमध्ये ३५ वर्षांपासून येथील कामकाज चालत आहे. अंबरनाथमधील जवळपास ७२ हजार शिधापत्रिकाधारकांना या कार्यालयातून सेवा देण्याचा येथील कर्मचारी प्रयत्न करत आहेत. १७ कर्मचाऱ्यांची पदे अजून रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही.
या दोन्ही कार्यालयांमध्ये कागदपत्रांचे ढीग साठत असून ते ठेवण्यासही जागा आता अपुरी पडू लागली आहे. दोन्ही शहरातील शिधावाटप कार्यालयांच्या या अवस्थेबद्दल कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नसून या कार्यालयांच्या अवस्थेबद्दल शासनाने देखील कोणतीही उपाययोजना न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संकेत सबनीस, अंबरनाथ
शिधावाटप कार्यालये दारिद्रयवस्थेत!
सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या आयुष्याचा शिधा पुरविणाऱ्या शिधावाटप कार्यालयांनाच आता ‘दुरुस्तीचा शिधा’ पुरविण्याची वेळ आली आहे.
आणखी वाचा
First published on: 06-02-2015 at 12:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur rationing offices in bad condition