बदलापूरः राज्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपातील संबंधांमुळे राजकारण तापले असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात वातावरणातही उकाडा जाणवला. ठाणे जिल्ह्याचे फेब्रुवारीतील मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. बदलापूर शहरात एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असतानाच बदलापुरात तब्बल ३८.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. खासगी हवामान अभ्यासकांनी ही नोंद केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील राजकारण विविध मुद्द्यांमुळे तापले आहे. वातावरणातही गेल्या काही दिवसात तापमानात चढ उतार नोंदवले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा आणि दुपारी तापमानात उष्णता जाणवत असल्याचे दिसून आले होते. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पारा खाली आला होता. त्याचवेळी दुपारी मात्र उष्णतेमुळे लाही लाही होत असल्याचे जाणवत होते. गेल्या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.

जिल्ह्यात बदलापुरात ३८.१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर मंगळवारी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मंगळवारी बदलापुरात दुपारी तीनपर्यंत ३८.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. तर जिल्ह्याचे सरासरी तापमानही ३८ अंशावर असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. तर दुसरीकडे बदलापुरात भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात शाब्दीक चकमकी सुरू आहेत. या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच वातावरणातही उष्णता वाढल्याचे मंगळवारी दिसून आले.

आजचे शहरनिहाय कमाल तापमान
(तीन वाजेपर्यंत)
पालघर ३७.८
नवी मुंबई ३८.१
ठाणे ३८.२
कल्याण व उल्हासनगर ३८.६
मुंब्रा व पनवेल ३८.७
डोंबिवली व बदलापूर ३८.७
कर्जत ३८.९
मुरबाड ३९.४