बदलापूर: बदलापूर पश्चिमेत उल्हास नदीकिनारी नुकत्याच अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या शिव आरतीसाठी शिवजयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी शेकडो बदलापूरकरांनी गर्दी केली. एक ताल सुरत रंगलेल्या आरतीत लहान वृद्ध दंग झाले. त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण बदलून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याचे अनावरण झाले होते.
बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बदलापुरात उल्हास नदीकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ शिल्प उभारण्यात आले आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. बदलापूर शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. बदलापुरात शेकडो वर्ष जुने छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे.
येथील शिवजयंतीला शंभरहून अधिक वर्ष पूर्ण झाले आहेत. हाच ऐतिहासिक धागा पकडत स्थानिक आमदार किसन यांनी या पुतळा उभारणीचे काम हाती घेतले होते. ते पूर्ण झाल्यानंतर शिवजयंतीच्या पूर्व संध्येला पुतळ्याचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण झाले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी शिवजयंती निमित्त येथे शिवशिल्प आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या शिव आरतीसाठी शेकडो बदलापूरकरांनी गर्दी केली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिव आरतीला सुरुवात झाली.
पुतळा परिसरात असलेले शिवभक्त आणि रस्त्याच्या चारही बाजूंनी गोळा झालेल्या नागरिकांनी आरतीत सहभाग घेतला. लहान मुले, महिला, वृद्ध अशा सर्वांनी या आरतीसाठी हजेरी लावली. एक ताल सुरात या आरतीने वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो, जय भवानी जय शिवाजी, या घोषणांनी परिसर दणाणून केला. आरतीनंतर येथे भव्य फायर शो आयोजित करण्यात आला होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा फायर शो पाहण्यासाठी बदलापूरकरांनी मोठी गर्दी केली. यावेळी आमदार किसन कथोरे, बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि बदलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.