ठाणे – बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची सविस्तर चौकशी करण्याचे आणि त्याचे अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगवारी उशिरा दिले. यानंतर नागरिकांकडून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. तसेच समाजमाध्यमांवरही पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर आज अखेर दुपारी १ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई आदर्श शिक्षण संस्थेची भेट घेणार असून स्थानिक पोलीस प्रशासनासमववेत बैठक घेणार आहेत.

बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध बदलापूरवासियांनी मंगळवारी शहर बंदची हाक पुकाराली होती. मात्र या बंदमध्ये आंदोलकांच्या विरोधाचा उद्रेक झाला आणि त्याचे काही ठिकाणी हिंसेत देखील रुपांतर झाले. मात्र इतकी मोठी घटना घडलेली असतानासुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देण्याचे तर दूरच मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अथवा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दुपारपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत. तर दुपारी उशिरा स्थिती हाताबाहेर गेल्याने पालकमंत्री देसाई यांनी शाळेच्या संस्थेशी निगडित असलेल्या सर्वांची आणि गुन्हा दाखल करून घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल संबंधितांची तात्काळ चौकशी करावी, असे आदेश जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला दिले. तर या चौकशीचे दोन दिवसांत अहवाल सादर करण्यात यावे असेही आदेश पालकमंत्र्यांनी दुपारी दिले. मात्र घटनास्थळी पालकमंत्र्यांनी मंगळवारीच भेट देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी भेट देण्याचे टाळले त्यामुळे नागरिकांकडून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. तसेच समाजमाध्यमांवरही पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता.

हेही वाचा – Badlapur School Case : बदलापुरात आंदोलन का पेटले? पोलिसांचा निष्काळजीपणा, शाळा प्रशासनाचे मौन आणि…

हेही वाचा – आता महाराष्ट्र बंद करण्याची वेळ आली आहे – जितेंद्र आव्हाड

यानंतर आज अखेर पालकमंत्री देसाई दुपारी १ वाजता आदर्श शिक्षण संस्थेची भेट घेणार आहे. तसेच दुपारी दीडच्या सुमारास बदलापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.