School Male Cleaner Abuse Girls in Badlapur: बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. तीन तासांहून अधिक काळ सुरू असलेले हे आंदोलन आता चिघळले असून आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याचे दिसून आले.
तीन तासांहून अधिक काळ मध्य रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यासाठी बळाचा वापर करण्याची भाषा केली. तसेच आंदोलकांच्या दिशेने मार्च करायला सुरुवात केली होती. पोलिसांना आपल्या दिशेने येताना पाहून आंदोलक खवळले आणि त्यांनी ट्रॅकवरील दगड उचलून पोलिसांच्या दिशेने फेकायला सुरूवात केली. त्यामुळे पोलिसांनी माघार घेत बळाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला.
सध्या संतप्त आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. मात्र महिला आंदोलक आणि इतर आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आरोपीला तात्काळ फाशी द्यावी, अन्यथा आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी आंदोलक करत आहेत. पोलीस कायदेशीर प्रक्रियेबाबत महिला आंदोलकांची समजूत घालत आहेत. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचे दिसत आहे.
स्वतःला आनंद दिघेंचे चेले म्हणवता ना…
दरम्यान काही महिलांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला आनंद दिघेंचे चेले म्हणतात. पण आनंद दिघे आज असते तर त्यांनी ताबडतोब न्याय केला असता, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली. दुसरी एक महिला म्हणाली की, आज याठिकाणी आंदोलन सुरू असताना एकही नेता पुढे आलेला नाही. जर गौतमी पाटीलचा कार्यक्रम असता तर नेते लगेत पुढे आले असते. तसेच अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेवरही टीका केली.
हे ही वाचा >> Badlapur Crime : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महिलांचा संताप; “तुमचे १५०० रुपये आणि लाडकी बहीण योजना नको, त्यापेक्षा..”
नेमके प्रकरण काय?
बदलापूर पूर्वेतील आदर्श या नामांकीत शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील छोट्या शिशु वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षांच्या दोन मुलींवर हा प्रसंग घडला. एका मुलीने आपल्या पाल्यांना शाळेतील दादा नावाने परिचीत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत कळवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वेतील एका रूग्णालयात तपासणीसाठी नेले.
या तपासणीनंतर रूग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेळ घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.