बदलापूर: एरवी शहरात झालेल्या कोणत्याही राड्यात हक्काने कार्यकर्त्यांसाठी पोलीस ठाण्याची पायरी झिजवणारे नेते आदर्श शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणावर शांत होते. त्यात इतका गंभीर प्रकार झालेला असतानाही स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात घेतलेले आढेवेढे आणि शाळा प्रशासनाने बाळगलेले मौन या कारणांमुळे बदलापुरात नागरिकांचे उत्स्फूर्त आंदोलन पेटले. कोणत्याही नेतृत्वाविना झालेले हे आंदोलन सुरू झाले. मात्र त्याच्या संपण्याची चिन्हे नव्हती. त्यामुळे आंदोलन जवळपास १२ तास चालले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर शहर तसे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यात बदलापुरातील आदर्श शिक्षण संस्था ही शहरातील सर्वात जुनी संस्था म्हणून परिचित आहे. शिशु वर्गापासून उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण या संस्थेत दिले जाते. मात्र १३ ऑगस्ट रोजी येथील शिशु वर्गातील दोन तीन वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला. मुलींनी आई-वडिलांना दिलेल्या माहितीनंतर एका मुलीच्या पालकांनी खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली. या पालकांनी त्याची माहिती सहकारी मुलीच्या पालकांना दिली. त्यानंतर त्यांनीही वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. १६ ऑगस्ट रोजी याप्रकरणी पालकांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. यातील मुलीची आई गरोदर होती त्यानंतरही त्या महिलेला तब्बल ११ तास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी बसून राहावे लागले. त्यात गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महिला बालहक्क आयोगाच्या सदस्यांना पाचरण करावे लागले. त्यानंतर दबाव वाढल्याने पोलिसांनी मध्यरात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – Badlapur sexual assault : “बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता, कारण..”; संजय राऊत यांचा आरोप

दुसऱ्या दिवशी तपासाची चक्रे फिरली आणि आरोपीला अटक करण्यात आली. चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर असतानाही स्थानिक बदलापूर पूर्व पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे शहरभरात पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही शहरातील कोणत्याही नेत्याने लागलीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा तपासाला गती देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे शहरात पोलीस आणि लोकप्रतिनिधींविरुद्ध संताप व्यक्त होत होता. अशातच आदर्श शैक्षणिक संस्थेने या प्रकरणात पुढाकार घेऊन पालकांना मदत करणे त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र संस्थेने यात मौन बाळगल्याने पालकांमध्ये संताप वाढत गेला. दबाव वाढल्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात घटनेच्या सहा दिवसानंतर संस्थेच्या वतीने निवेदन जारी करत पालकांची माफी मागण्यात आली. तसेच शाळेत मुख्याध्यापिकेसह वर्गशिक्षिका आणि दोन सहकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. मात्र तोपर्यंत शहरात पालक आणि नागरिकांमध्ये संताप वाढला होता.

विविध राजकीय पक्ष संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी मंगळवारी बदलापूर बंदचे आवाहन केले. तसेच शाळेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला. समाज माध्यमांवर या आंदोलनाविषयी अनेक पोस्ट फिरत असतानाही पोलिसांनी या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले नाही. आंदोलन स्थळी पोलिसांची कोणतीही तयारी दिसली नाही. मंगळवारी सहा वाजल्यापासून नागरिक शाळेसमोर जमत होते. आंदोलकांमध्ये पुढाकार घेतलेले राजकीय पक्षाचे पदाधिकारी आंदोलनाच्या काही तासांतच आंदोलनापासून दूर झाले. त्यानंतर आंदोलन नेतृत्वहीन झाले. काही आंदोलकांनी रेल्वे स्थानकाकडे मोर्चा वळवत रेल्वे सेवा ठप्प केली. यावेळी पोलिसांचे कोणतेही नियोजन दिसले नाही. पोलीस हतबल असल्यासारखे दिसत होते. शाळेबाहेरील आंदोलन असो वा रेल्वे स्थानकातील आंदोलन दोन्ही ठिकाणी कोणतेही शिष्टमंडळ चर्चेसाठी समोर आले नाही. त्यामुळे आंदोलन दिशाहीन झाल्याचे चित्र होते. या काळात आंदोलनाचे गांभीर्य ओळखून राज्यभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली खरी. मात्र स्थानिक नेते असो व राज्याचे मंत्री यांच्या कोणाच्याही निवेदनाला आंदोलकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे स्थानिक राजकीय नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याने आंदोलनाचा शेवट झाला.

हेही वाचा – Badlapur sexual assault : “बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता, कारण..”; संजय राऊत यांचा आरोप

या आंदोलनात सहभागी अनेक तरुण तरुणींनी निषेधाचे काळे कपडे परिधान केले होते. काही आंदोलक टप्प्याटप्प्याने आंदोलनात सहभागी होत होते. काही आंदोलक राजकीय फलक घेऊन यात सहभागी झाले. लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या बॅनरवर बोलताना हे राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. तर आंदोलनात शहराबाहेरील काही लोक सहभागी झाल्याचा संशय काही राजकीय लोकांनी व्यक्त केला. काही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आंदोलकांनी पिटाळून लावले. तर काही पक्षाचे लोक शेवटपर्यंत आंदोलनात होते. त्यामुळे आंदोलकांमध्ये असंतोष दिसून आला. आदर्श शाळेबाहेरील आंदोलक शाळेत शिरले त्यावेळी काही आंदोलकांच्या हाती ज्वलनशील पदार्थ होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शाळा पेटविण्याच्या हेतूने हे आले होते का असा प्रश्न निर्माण होतो आहे. तसेच हे पालकच होते का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर शाळा आणि पोलिसांच्या हलगर्जीपणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कुणी चुकीच्या विचारांनी पालकांना भडकवत असेल तर पालकांनी शांततेने घ्यावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले होते. सर्वांनी शांतता राखावी असेही आवाहन कथोरे यांनी केले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur school case why protest in badlapur the negligence of the police the silence of the school administration and ssb