Badlapur Crime Train Roko : बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य (Badlapur Crime ) केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली. याचा त्रास बदलापूरहून मुंबईला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या लोकांना झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांना लाठीचार्ज करुन आंदोलकांना पांगवावं लागलं

९ तासांनी आंदोलन संपवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. या प्रकरणात २२ आंदोलकांना ताब्यात घेण्यात ( Badlapur Crime ) आलं आहे. या सगळ्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कल्याण येथील न्यायालयाने हा निर्णय देताच आंदोलकाच्या एका आईने कोर्टाच्या परिसरात हंबरडाच फोडला.

शालिनी घोलप यांनी मांडली त्यांची व्यथा

शालिनी दिलीप घोलप असं रडून आक्रोश करणाऱ्या आईचं नाव आहे. बदलापूर स्थानकात आंदोलन ( Badlapur Crime ) करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यापैकी एक म्हणजेच रोहित घोलप हा त्यांचा मुलगा आहे. शालिनी घोलप यांनी रोहितला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची व्यथा माध्यमांसमोर मांडली.

हे पण वाचा- मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी, शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

शालिनी घोलप काय म्हणाल्या?

“मी गावी गेले होते. आमच्या घरी माझा मुलगा आणि त्याची बायको असे दोघेजण होते. माझा मुलगा रोहित रात्री कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला, लोकल सुरु आहेत का ते बघतो, असं तो म्हणाला होता. मात्र पोलिसांना त्याला आंदोलनकर्त्यांसह ताब्यात ( Badlapur Crime ) घेतलं. मी गावावरुन आले तेव्हा मला हे सगळं समजलं.” असं शालिनी घोलप यांनी रडत रडत माध्यमांना सांगितलं.

शालिनी घोलप यांना कोर्टाच्या आवारातच रडू कोसळलं

“रोहित घोलप हे माझ्या मुलाचं नाव आहे, मी एकटीच आहे. माझ्या मुलाला सोडा इतकीच माझी विनंती आहे. मला त्याच्याशिवाय दुसरं कुणीही नाही. लॉकडाउन लागला होता तेव्हा माझ्या पतीचं निधन झालं आहे. माझा मुलगा बीकेसी येथील डायमंड कंपनीत काम करतो. तो आंदोलनात होता की नाही माहीत नाही पण सगळे सांगत आहेत की तो फक्त लोकल सुरु आहेत का? ते बघायला गेला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याला कृपा करुन सोडा” असं सांगत शालिनी यांना रडू कोसळलं.

बदलापूरमध्ये लोकांचं आंदोलन, कोर्टात एका आईने मुलाला सोडा म्हणत केला आक्रोश (फोटो-फेसबुक )

३०० हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल

बदलापुरात झालेल्या धक्कादायक घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे, पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात ३०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले. तर आंदोलन दरम्यान शाळेची तोडफोड, बस आणि इतर गाड्यांची तोडफोडसह बदलापूर शहरात देखील दीड हजार पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur school crime case rail roko andolan protesters 14 days custody mother cries in front of court scj