बदलापूर: बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमूरड्यांवर अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करत असताना दिरंगाई केली. त्याविरुद्ध बदलापुरात संताप व्यक्त होत होता. २० ऑगस्ट रोजी बदलापुरात नागरिकांचे उग्र आणि उत्स्फूर्त असे आंदोलन झाले. या आंदोलनात काही आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली. तर काही आंदोलकांनी जवळपास नऊ तास मध्य रेल्वेचे वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली. आरोपी अक्षय शिंदे ला फाशी व्हावी अशी आंदोलकांची मागणी होती. त्यामुळे हे प्रकरण देश पातळीवर चर्चेत आले.
याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्यावर दोन गुन्ह्यांची नोंद झाली. पक्ष अंतर्गत अक्षय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल झाले. राज्य सरकारने विशेष तपासणी समितीची ( एसआयटी) निर्मिती केली. त्यासाठी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. गेल्या आठवड्यात एसआयटीकडून याप्रकरणी आरोप पत्र दाखल करण्यात आले होते. महिना उलटूनही शाळेचे संस्थाचालक पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे.