बदलापूर : चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर बंद असलेली बदलापूर पूर्वेतील ‘ती’ शाळा हळूहळू सुरू होत असून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांच्या हालचाली सुरू आहेत. भीतीच्या छायेत असलेल्या पालकांशी संवाद साधून शाळेतील विद्यार्थी सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन पालकांच्या मनातील प्रश्न समजून घेतले जात आहेत. त्यामुळे लवकरच संपूर्ण शाळा सुरू सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
बदलापूर पूर्वेतील एका नामांकीत शाळेत दोन मुलींच्या अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले होते. सुरूवातीला शाळा प्रशासन, मग पोलीस आणि नंतर शासकीय रूग्णालयांनी या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर बदलापुरात अभूतपूर्व असे आंदोलन उभे राहिले. त्याची दखल देशभरातील राजकीय नेते, संघटना आणि शासकीय संस्थांनी घेतली. याप्रकरणातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हे सर्व होत असताना शाळेच्या निष्काळजीपणामुळे शाळेवर प्रशासकांची नेमणूक झाली. आंदोलनादरम्यान मोडतोड झालेली शाळा पूर्वपदावर आणली जाते आहे. संस्थेच्या पाचवी ते बारावीच्या वर्गांना गेल्याच आठवड्यात सुरू करण्यात आले. तर ज्या पूर्व प्राथमिक विभागात अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले त्या विभागातील विद्यार्थांची शाळा १७ ऑगस्टपासून बंद आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा विभागही लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासकांनी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रशासकांच्या आदेशानंतर आता या विभागातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पालकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक वर्गाच्या शिक्षिका पालकांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत असून शाळेत सुरू करण्यात आलेल्या विविध गोष्टींबाबत माहिती दिली जाते आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेले निर्णय, त्याची केलेली अंमलबजावणी याबाबतही पालकांना सांगितले जाते आहे. शाळा प्रशासकांच्या आदेशानंतर सुरू करण्यात येणार असून तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चित्रफितींद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाणार आहे.
हेही वाचा…लोणी खाणाऱ्याची हंडी दोन महिन्यांनी फोडणार; शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा
शाळेत आता सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी व्यक्तीची नेमणूकही करण्यात आली आहे. तसेच शाळेत सर्वच महिला कर्मचारी असून त्यांना आता एक ड्रेसकोड ठेवला जाणार आहे. मुलींच्या प्रसाधनगृहात ने आण करण्यासाठी महिला कर्मचारीच असणार आहेत.
हेही वाचा…डोंबिवली जवळील रुणवाल गार्डन, पलावा येथे वाहनांच्या काचा फोडल्या
पालक प्रतिनिधी नेमणार
विद्यार्थांच्या समस्या शाळा प्रशासनासमोर मांडण्यासाठी आता वर्गानिहाय पालक प्रतिनिधी नेमला जाणार आहे. शाळेत तक्रार आणि सूचना पेटी बसवण्यात आली आहे. सोबतच सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. शाळेत प्रशासक, शिक्षिका, सल्लागार, पोलीस, डॉक्टर, परिचारिका आणि पालक प्रतिनिधींची सखी सावित्री समिती नेमण्यात आली आहे. शाळेत आता दिवसातून दोनदा हजेरी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बस, रिक्षा चालकांचीही माहिती ठेवली जाणार असून त्यासाठी वाहतूक समिती नेमली जाते आहे.
© The Indian Express (P) Ltd