मुंबईचे उपनगर म्हणून झपाटय़ाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहराची हद्दवाढ होणे महत्त्वाचे असून या निवडणुकीनंतर बदलापुरात तीन किलोमीटपर्यंत हद्दवाढ करण्याचा सरकारचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारसभेदरम्यान बोलत होते.
या वेळी मुख्यमंत्री या नात्याने बदलापूरच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी ही इथून पुढे माझी राहील असेही देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. या वेळी भिवंडीचे खासदार कपिल पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते.
राज्यात शहरांचा विकास होत असून गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारच्या काळात या शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून शहर विकासाचे अनेक प्रकल्प हे गेल्या आठ-आठ वर्षांपासून नगरविकास खात्याकडे प्रलंबित होते. ते प्रकल्प मी गेल्या दोन महिन्यांत मंजूर केले असून बदलापूरच्या विकास आराखडय़ाचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच, कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी ग्रामपंचायतींनी ठराव केले असून हद्दवाढीचा प्रश्नदेखील नगरपालिका निवडणुकीनंतर पूर्ण होईल. तसेच नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सेवाहमी विधेयक सभागृहात मांडले असून प्रशासन नागरिकांच्या सेवेत कमी पडल्यास कर्मचाऱ्यांवर या विधेयकांतर्गत कारवाई करण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur seeks extensions