बदलापूर : “बदलापुरात जे काही घडले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोच मात्र त्या दुर्दैवी प्रकरणावर विकृत राजकारण नको – एक सजग बदलापुरकर” अशा आशयाचे फलक बदलापूर शहरात बुधवारी दुपारपासून ठिकठिकाणी झळकले. तसेच यात ‘Mychildnotforpooitics’ अशा आशयाचे हॅश टॅग देखील वापरण्यात आले. यामुळे बदलापूरवासी या लहान मुलींच्या अत्याचारावरून पेटलेल्या राजकारणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत असल्याचे चर्चा सर्वत्र सुरू झाली होती.
बदलापूर शहरातील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो बदलापूरवासियांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनाला मंगळवारी दुपारनंतर हिंसक वळण लागले. तर अनेक आंदोलकांनी तब्बल नऊ ते दहा तास रेल रोको आंदोलन केले. यामध्ये काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत शासकीय योजनांच्या विरोधातील फलकबाजी देखील केली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी आणि रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. यावेळी सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी रेल्वे स्थानकात भेट देत लोकांशी संवाद साधला. यावेळी या राजकीय नेते मंडळींनी एकमेकांवर आरोप देखील केले. तसेच बुधवारी देखील अनेक नेत्यांनी बदलापूर पूर्व येथील पोलिस ठाण्यात भेट दिली. यामुळे बुधवारी बदलापूर शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली.
हेही वाचा…बदलापुरातील रेल रोको आंदोलनाची चौकशी केली जाणार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती. यामुळे सर्वसामान्य बदलापूर वासियांना नाहक त्रास सहन करावा लागला. असे असतानाच बदलापुरातील या घटनेवर सुरू असलेल्या राजकारणाच्या विरोधात बॅनर्स लावण्यात आले होते. “बदलापुरात जे काही घडले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोच मात्र त्या दुर्दैवी प्रकरणावर विकृत राजकारण नको – एक सजग बदलापुरकर” अशा आशयाचे बॅनर्स बदलापूर शहरात बुधवारी दुपारपासून ठिकठिकाणी झळकू लागले होते. तसेच यात ‘Mychildnotforpooitics’ अशा आशयाचे हॅश टॅग देखील वापरण्यात आले होते. मात्र हे बॅनर कोणी लावले याची माहिती मिळू शकली नाही.