Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला आहे. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावरून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात या आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे. तसेच सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत.

ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता घेऊन असताना मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या वाहनातच घडला.

हेही वाचा – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेंच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांची क्राईम ब्रॉंच टीमने त्याला ताब्यात घेतले होते. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला यात तो ठार झाला.

हेही वाचा – Akshay Shinde : बदलापूर प्रकरणातील आरोपी पोलीस चकमकीत ठार, “पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?” वडेट्टीवारांचा प्रश्न; म्हणाले, “संस्थाचालक भाजपाशी…”

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी अक्षय शिंदेच्या आईने टीव्ही ९ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ”माझा पोरगा असं काही करणार नाही ( बदलापूरच्या घटनेबाबत ) माझा पोरगा एकदम गरीब होता, अशी घाण सवय त्याला लावलेली नाही, माझा पोरगा फटाकाही वाजवत नाही, तो गाड्यांना घाबरायचा”, असे त्या म्हणाल्या.