बदलापूरः बदलापूर शहरातील चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होण्यात आणि झालेल्या उत्स्फुर्त आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसेच्या संगिता चेंदवणकरही विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख असलेल्या संगिता चेंदवणकर यांचे राज ठाकरे यांनी जाहीर कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनाच उमेदवारी देण्याची चर्चा मनसेत रंगली आहे. लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरबाड विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठी लोकसंख्या बदलापूर शहराची आहे. बदलापूर शहरातील मते निर्णायक ठरतात. गेल्या १५ वर्षे आमदार किसन कथोरे येथून प्रतिनिधीत्व करतात. २००९ च्या निवडणुकीत कथोरे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश घेत २०१४ आणि २०१९ ची निवडणूक जिंकली. या निवडणुकांमध्ये त्यांना गोटीराम पवार, वामन म्हात्रे यांनी आव्हान दिले. सध्या वामन म्हात्रे आणि किसन कथोरे महायुतीत असून गोटीराम पवार राजकारणातून दूर झाले आहेत. मात्र त्यांचे पुत्र सुभाष पवार यंदा इच्छुक आहेत. महायुतीत कपिल पाटील विरूद्ध किसन कथोरे भाजपांतर्गत तर वामन म्हात्रे आणि सुभाष पवार विरूद्ध किसन कथोरे असा शिवसेना – भाजप वाद सुरू आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुरबाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती मनसेतील सुत्रांनी दिली आहे. बदलापूर शहरात दोन महिन्यांपूर्वी एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांनी यात पुढाकार घेतल्याने उशिरा का हाईना गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शहरात नागरिकांनी उत्स्फुर्त आंदोलन केले. याचेही नेतृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. या घटनेला वाचा फोडल्याबद्दल राज ठाकरे यांनी चेंदवणकर यांचे जाहीर कौतुक केले.

हे ही वाचा… रेल्वे प्रवाशांना बिस्किटमधून गुंगीचे औषध देऊन, चोऱ्या करणारा कल्याण रेल्वे स्थानकात अटक

आंदोलनानंतर ठाकरे यांनी काही दिवसात बदलापुरात येऊन पालकांशी संवाद साधत चेंदवणकर यांची पाठ थोपटली होती. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी चेंदवणकर यांचा विशेष सत्कार करत त्यांचा गौरव केला. बदलापुरातील प्रकरणाला मनसेमुळे न्याय मिळाला याचा राज ठाकरे यांनी वारंवार उल्लेख केला. त्यामुळे संगिता चेंदवणकर यांच्यावर मनसेत मोठी जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता होती. त्यातच आता मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवार दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मनसेतील खात्रीलायक सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज ठाकरे यांनी राज्यात सर्वाधिक जागा लढण्याचे यापूर्वीच घोषीत केले आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात आता चेंदवणकर यांच्या माध्यमातून महिला चेहरा देत विद्यमान आमदार किसन कथोरे यांना आव्हान देण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. लवकरच याची घोषणा होणार असल्याचीही माहिती मिळते आहे.

प्रभावी महिला उमेदवार

शहरातील मराठी फेरिवाले यांच्या हक्कासाठी, उत्तर भारतीय विक्रेत्यांविरूद्ध, शहरातील विविध समस्यांवर आंदोलन करत संगिता चेंदवणकर प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांच्या रूपाने प्रभावी महिला उमेदवार मुरबाडमध्ये मिळू शकतो. यापूर्वी बहुजन समाज पक्षातर्फे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शोभा इंगळे तर २००९ मध्ये रत्ना गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. २०१४ मध्ये एकही महिला उमेदवार रिंगणात नव्हती.

हे ही वाचा… डोंबिवलीतील वाहन कोंडी आठ दिवसात सोडवा, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांचे आदेश

मनसेची मते विखुरलेली

बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर शहरात मनसेबद्दल सहानभूती निर्माण झाली आहे. मात्र शहरात मनसेची ताकद पूर्वीपेक्षा कमी आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत एकही मनसेचा उमेदवार निवडून आला नव्हता. तर २००९ च्या निवडणुकीत वामन म्हात्रे यांनी मनसेतून निवडणुक लढवत ३७ हजार मते घेतली होती. त्यामुळे मनसेला संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्यावे लागणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur sexual assault case agitator lady will be mns candidate from murbad assembly constituency asj