बदलापूरः बदलापुरातील लहानग्यांचा अत्याचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यापासून केलेल्या दिरंगाईवरून बदलापूर पोलीसांना सरकारसह उच्च न्यायालयानेही फटकारले होते. त्यानंतर आता २० ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनाच आरोपींच्या पिंजऱ्यात पोलीसांनी उभे केले आहे. एका माध्यम प्रतिनिधीला याप्रकरणी नोटीस बजावल्याने संताप व्यक्त होतो आहे. आणखी एका माध्यम प्रतिनिधीचे नाव आरोपींच्या यादीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर पूर्वेतील एका शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास उशिर केल्याने आणि प्रकरण बेजबाबदारपणे हाताळल्याने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. पोलिसांच्या या बेजबाबदारपणावर राज्यभरातून संताप व्यक्त झाला. शाळा, पोलीस प्रशासनाने केेलेल्या दुर्लक्षाविरूद्ध संतप्त नागरिक आणि पालकांनी शाळेसमोर आणि रेल्वे स्थानकात आंदोलन केले. या आंदोलनाप्रकरणी तीन गुन्ह्यांमध्ये १२०० ते १५०० जणांना आरोपी करण्यात आले आहे. यात शंभरहून अधिक आरोपींना अटक करून जामीनावर मुक्त करण्यात आले. मात्र याप्रकरणी आंदोलनाचे वृत्ताकंन करत असलेल्या माध्यम प्रतिनिधींचाही आरोपींमध्ये समावेश केल्याने संताप व्यक्त होतो आहे. संबंधित अत्याचार प्रकरणाचे सुरूवातीपासून वृत्तांकन करणाऱ्या स्थानिक माध्यम प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे यांनाही पोलीसांनी भिवंडी घटक दोनच्या गुन्हे शाखा कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. तर एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असलेल्या अमित जाधव यांचेही नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे दोन्ही माध्यम प्रतिनिधी आंदोलनाचे वृत्तांकन करत होते.

हेही वाचा : दुबईचे बनावट दिनार चलन देऊन डोंबिवलीतील घाऊक औषध विक्रेत्याची चार लाखाची फसवणूक

याबाबत श्रद्धा ठाेंबरे यांना विचारले असता, शाळेसमोर आंदोलनास्थळी सुरू असलेल्या आंदोलनात स्थानिक सहायक पोलीस आयुक्तांनी पालक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत मलाही शाळेच्या सभागृहात नेले होते. त्यावेळी संवाद साधण्यासाठी माझी मदत घेण्यात आली. तसेच आंदोलन उग्र होत असताना मला पोलिसांना सुरक्षितरित्या बाहेरही काढले, मग मी दगडफेक कधी केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर गंभीर गुन्हे दाखल करणे निषेधार्ह असल्याचेही ठांबरे यांनी सांगितले आहे. माध्यमांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी विविध पत्रकार संघटनांनी निषेधही व्यक्त केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur sexual assault case media reporters included as accused css