Badlapur Sexual Assault Case Update: बदलापूर मधील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना ४४ दिवसानंतर अटक करण्यात आली. आज न्यायालयात त्यांना सादर केले असताना न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली आहे. त्याआधी न्ययाालयाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीविरोधात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने एका प्रकरणात जामीन तर दुसऱ्या प्रकरणात अटकेची परावानगी देण्यात आली आहे.
सरकारी वकील भामरे पाटील म्हणाले की, बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाले होते. गुन्हा क्रमांक ३८० मध्ये दोन्ही आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर गुन्हा क्र. ३८१ मध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. आता दुसऱ्या प्रकरणातील जामिनावर उद्या सुनावणी होईल. त्यामुळे कोतवाल आणि आपटे यांना जामीन मंजूर झाला असला तरी आज कोठडीतच राहावे लागणार आहे.
बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला. या प्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी दुर्लक्ष केले. २० ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर न्यायालयाने त्याची दखल घेत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेच्या संचालकांवर ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. २० ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात झालेल्या तोडफोडीची पाहणी करणारे संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि तुषार आपटे दुसऱ्याच दिवसापासून फरार होते. सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.