Badlapur Sexual Assault : बदलापुरात १३ ऑगस्ट रोजी दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला. अत्याचाराची तक्रार करायला गेलेल्या पालकांना पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवलं गेलं. पीडितेची आई गरोदर असतानाही त्यांना १० तासांहून अधिक काळ थांबवून ठेवलं. वैद्यकीय अहवाल आलेला असतानाही गुन्हा दाखल केला गेला नाही. असा अनेकविध कारणांमुळे विरोधकांनी याप्रकरणी राळ उठवली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आज बदलापुरात आंदोलन केलं. परंतु, त्यांना अडवण्यात आलं. तसंच, त्यांनी सरकारवरही टीका केली.
“महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. गेल्या १० वर्षांत एकूण साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस मंत्री आहेत. ज्यांनी न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. पण ज्या वामन म्हात्रेने अत्यंत घाणेरडी टिप्पणी केली त्याला तुम्ही सोडून देता. वामन म्हात्रेला का अटक केली नाही? प्रश्न विचारणाऱ्या पालकांना अटक करता आणि वामन म्हात्रेला वेगळी ट्रिटमेंट का? एकनाथ शिंदेंचा तो जवळचा आहे म्हणून? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
अक्षय शिंदेऐवजी अकबर शेख असता तर…
“अक्षय शिंदेऐवजी अकबर शेख वगैरे असता तर नितेश राणेने थयथयाट केला असता. हलकटपणा आहे हा. तुम्ही जात धर्म बघून व्यक्त होता का. तुमच्या लेखी लेकीबाळींच्या सुरक्षा काही आहे की नाही”, असं म्हणत त्यांनी नितेश राणेंवरही हल्लाबोल केला. “न्याय मिळाला असता तर का लोकांनी आंदोलन केलं असतं का? यांना न्यायच द्यायचा नाहीय. यांना काहीच द्यायचं नाहीय. कमिशनर डुंबरे यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं. का लोक संतप्त झाले आहेत”, असं म्हणत त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांनी जाब विचारला आहे.
हा मस्तवालपणा येतो कुठून?
“आम्हाला तुम्ही पॉलिटिकल मोटिव्हेटेड म्हणता. वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारतेय आणि भाजपाचा पदाधिकारी वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला बोलतो की, तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखं का बोलतेस. हा मस्तवालपणा कुठून येतो. आंदोलन तुम्ही चिघळवलंत. तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था जपायचं असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही?”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
उज्ज्वल निकम मान्य नाही
दरम्यान, या प्रकरणी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमण्यात आलं आहे. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, “आम्हाला सरकारी वकील उज्ज्वल निकम मान्य नाही. उज्ज्वल निकम सरकारी वकील नाहीत. ते भाजपाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी भाजपा तिकिटावर निवडणूक लढवली. मग सरकारी वकील कसं करता तुम्ही. आम्हाला मान्य नाही”, असं म्हणत सुषमा अंधारेंनी उज्ज्वल निकम यांना विरोध दर्शवला आहे.