बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षांतर्गत कुरघोड्या वाढत असताना महायुतीतील पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीनेही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. बुधवारी बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भिवंडी लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुरबाड मतदारसंघाची मागणी केली आहे. मुरबाड मतदारसंघात बदलापूर आणि ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे आमचा दावा आहेच, असे म्हात्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध भाजप असे चित्र उभे राहिले आहे. विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षातील माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आघाडी उघडली आहे. नुकताच कपिल पाटील यांनी मुरबाडमध्ये कथोरे विरोधक आणि समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला निष्ठावंतांचा मेळावा असे नाव दिले. या मेळाव्यात पाटील यांनी कथोरे यांना थेट अपक्ष लढण्याचे सांगत ताकद दाखवण्याचे आव्हान केले. तसेच यावेळी कथोरे यांनी केलेल्या भूमीपूजन आणि इतर अनेक गोष्टींवरून कथोरे यांना लक्ष्य केले. लोकसभेत आलेले गद्दारीचे मळभ दूर करायचे आहे असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

हे ही वाचा…धक्कादायक… विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल; बालरोगतज्ज्ञ म्हणतात, “करोनापश्चात…”

जुन्या जाणत्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांची मोट बांधण्याचा कपिल पाटील यांचा प्रयत्न असतानाच दुसरीकडे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारीही आमदारकीसाठी गुढघ्याला बाशिंब बांधून तयार आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापूर शहराचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघावर दावा सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. भाजपातील अंतर्गत कलहामुळे महायुतीची भिवंडी लोकसभेची जागा हातून गेली. आता विधानसभेतही तसाच प्रकार सुरू आहे. त्यात या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे अशावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याची माहिती शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. बुधवारी वामन म्हात्रे आणि सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत मुरबाड मतदारसंघ शिवसेनेला घ्यावी अशी मागणी केली. म्हात्रे आणि पवार दोघेही इच्छुक असून ती तयारी दोघांनीही केली आहे. त्यामुळे आता मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध पक्षातील कपिल पाटील यांची आघाडी तर महायुतीतील शिवसेनेचे आव्हान असणार हे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा…भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, “कामठीतून लढणार नाही, पक्ष ज्याला…”

दावा का आणि चर्चा काय ?

किसन कथोरे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार होते. त्यांचा आजही त्या पक्षात चांगला संपर्क आहे. भाजपातून स्थानिक पातळीवर होणारा विरोध पाहता कथोरे पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे असे झाल्यास येथे शिवसेनेची तयारी असावी, म्हणून ही मागणी केली जात असल्याचे खात्रीलायक माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने खासगीत दिली आहे. मात्र कथोरे यांच्या गटाकडून यावर प्रतिक्रिया दिली जात नाही. तसेच दोन दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे यांनी मला भाजपातून तिकिट मिळत असताना मी अपक्ष का लढू अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे कथोरे भाजपातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे.