कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडणूक शिवसेना व भाजपात युती होणार की नाही या मुद्दय़ावरून पुन्हा गाजणार असल्याची चिन्हे सध्या दिसत असून या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युती होण्यासाठी अद्याप चर्चा चालू असल्याचे समजते आहे.
बदलापूर पालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक १८ मे रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज बुधवारी भरण्यात आले. यात शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक वामन म्हात्रे यांनी तर भाजपातर्फे नगरसेवक संजय भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. परंतु, युतीची बोलणी वरिष्ठ पातळीवर चालू असल्याची माहिती शिवसेनेचे ठाणे (ग्रामिण) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की शहराचा विकास हा सर्वाना सोबत घेऊन केल्यास जलद होऊ शकतो, त्यामुळे सर्वाची साथ आम्हांला अपेक्षित आहे. त्यामुळे अद्याप तरी शिवसेना व भाजपच्या नेत्यांना युतीची आशा असल्याचे दिसून येत आहे. परंतु, निवडणूकीपूर्वी ज्याप्रमाणे युतीबद्दलच्या चर्चेचा जो फार्स झाला तसा जर यावेळेस झाला तर मात्र भाजप निवडणूक लढवणार असल्याचे त्यांच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे ही निवडणूकही गाजणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
अंबरनाथमध्ये दोन अर्ज
अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शिवसेनेच्या नगरसेविका प्रज्ञा बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून हिराबाई जावीर या अपक्ष नगरसेविकेनेही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष नगरसेविका जावीर यांनी अर्ज भरल्याने शहरातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क दिवसभर लढविण्यात येत होते.