आता मुंबई महानगर परिसरात सर्वात वेगाने वाढणारे अशी ख्याती असणाऱ्या बदलापूर शहराचे वय साधारण वीस र्वष आहे. त्यापूर्वी कुळगांव-बदलापूर परिसर म्हणजे रेल्वे स्थानक असलेले एक मोठे गाव होते. आता घर घ्यायचे म्हटले की सर्वात आधी बदलापूर आठवते. मात्र नव्वदच्या दशकापर्यंत बदलापूरमध्ये सहसा कुणी घर घेण्याचा विचार करीत नव्हते. आता हे कुणाला सांगूनही विश्वास बसणार नाही. मात्र बदलापूर पश्चिमेकडे हेंद्रेपाडा येथील मानव पार्क त्याला साक्षीदार आहे. १९९८ मध्ये स्थापन झालेले हे बदलापूरमधील सर्वात पहिले आणि आजवरचे सर्वात मोठे गृहसंकुल आहे. त्या अर्थाने ती बदलापूरच्या शहरीकरणाची पायाभरणी आहे..

मानव पार्क, हेंद्रेपाडा, बदलापूर (प.)

नावातच मानव हा शब्द असलेल्या बदलापुरातील शहरातील सर्वात पहिल्या आणि सर्वात मोठय़ा अशा मानव पार्क या गृहसंकुलाच्या गोतावळ्याची गोष्टच वेगळी आहे. महादेव कन्स्टक्शन कंपनीने १९९८ मध्ये बांधलेल्या मानव पार्क या सोसायटीत २७ विंग असून तब्बल ३६३ घरे आहेत. या घरांच्या आकडय़ावरूनच आपल्याला या संकुलाची भव्यता जाणवते. शहरातील सर्वात मोठी वसाहत असल्याने त्यात सुविधा आणि रहिवाशीही विविध प्रकारचे आहेत. संकुलात प्रवेश करण्यापूर्वी या संकुलाची भव्यता आपल्या दृष्टीस पडते. भले मोठे असे दोन प्रवेशद्वार, त्यातील एक सध्या कायमचा बंद आणि एकामधून संपूर्ण संकुलाचा वावर दिसतो. संकुलाच्या आवारात आपल्याला छोटेखानी दुकाने दिसतात. मोठे प्रांगण आणि त्यानंतर इमारती, मध्यभागी उद्यान अशी रचना दिसते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीचा प्रत्यय मानव पार्कच्या जुन्याजाणत्या सदस्यांना चांगला आल्याचे दिसते. कारण अनेकांच्या बोलण्यातून ते जाणवते. कारण निर्मितीपासून ते आजपर्यंत मानव पार्कची अनेक शक्कले पडली आहेत. सध्या २७ विंगच्या या संकुलात एकूण सात सोसायटी कार्यरत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांची आलेली माणसे अधिक काळ एका छताखाली राहू शकत नाहीत याचा अनुभव आल्याचे सुदाम लोखंडे सांगतात. १९९८ मध्ये मानव पार्क अस्तित्वात आल्यानंतर जवळपास पाच वर्षे सोसायटीचा कार्यभार बिल्डरच्या सल्लय़ाने सुरू होता. २००३ मध्ये कन्स्टक्शन कंपनीने सोसायटीच्या सदस्यांकडे कारभार हस्तांतरीत केला आणि वेगवेगळ्या विचारांच्या रहिवाशांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली. साधारणत: अडीच एकर क्षेत्रात पसरलेल्या मानव पार्कच्या परिसरात कुठे ना कुठे काहीतरी काम सुरूच असते. मात्र याच विविध ठिकाणच्या कामांमुळेच सोसायटीच्या सदस्यांमध्ये मतभेदाची ठिगणी पडली आणि एका संसारातून फारकत घेत सध्या सात वेगवेगळे संसार थाटले गेले आहेत. मात्र त्या सर्वाना पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही लोखंडे सांगतात.

गेल्या काही वर्षांत अनेक कारणांमुळे मानव पार्कमधील मानवता कमी झाली असली तरी सध्या पुन्हा सर्वाना जोडण्याचे काम सुरू आहे. मोठा विस्तार असल्यामुळे अनेक मतांना एकाच वेळी लक्षात घेणे शक्य नाही. त्यामुळे अनेकदा रहिवाशांमध्ये दुरावा येतो. मात्र खऱ्या अर्थाने मानव पार्क करण्याकडे आम्ही वाटचाल करत असल्याचे मनीष श्रीवर्धनकर सांगतात. सध्या मानव पार्क येथे शंकर, साईबाबा आणि देवीचे असे एकत्रित शिवालय मंदिर आहे. तसेच छोटे गणेश मंदिरही आहे. त्यामागेच समाज मंदिर असून येथे सर्व जातीधर्माचे लोक कार्यक्रम करत असतात. शिवसाई मंडळाच्या माध्यमातून येथे काम केले जाते. विविधतेतील एकता मानव पार्कमधील अनेक कार्यक्रमांतून आजही बदलापुरात चर्चिली जाते. गणेशोत्सव असो वा बुद्धपौर्णिमेचा सण असो. सर्व जातीधर्माचे सण येथे आनंदाने साजरे केले जातात. आरोग्य शिबीरेही रहिवाशांसाठी आयोजित केली जातात. व्यावहारिकदृष्टय़ा मतभेद असले तरी अनेक कार्यक्रमांतून मानव पार्कचे खरे दर्शन आपल्याला दिसते, असे सुदाम लोखंडे सांगतात. विशेष बाब म्हणजे सोसायटीच्या आवारात अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते राहतात. मात्र कार्यक्रमाच्या वेळी सर्वातील एकता त्यांचे वेगळेपण दाखवून देते. सुख-दु:खांच्या प्रसंगी सोसायटीतील सर्व रहिवासी हेवेदावे विसरून एकत्र येतात. तेच एकत्रितपण एक सोसायटीच्या माध्यमातूनही दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे श्रीवर्धनकर सांगतात.

उन्हाळ्यात पाणीटंचाई

गेली अठरा वर्षे मानव पार्कच्या अनेक समस्या सर्वानी मिळून सोडवल्या आहेत. उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा लागल्यावर येथेही टँकरचा वापर करावा लागला. पाण्याची समस्या काही महिने सहन करावी लागत असल्याचे अनेक रहिवासी सांगतात. इमारतीचे बांधकाम अद्याप सुस्थितीत असून पुराचा फटका झेलूनही त्यांना काही झालेले नाही. मात्र सोसायटी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या विचारात आहे. सोसायटीच्या आवारात केंद्रभागी एक मोठे उद्यान आहे. त्याची निगा रहिवासी सार्वजनिकरीत्या राखत असतात. सध्या त्याची अवस्था तितकीशी ठीक नाही. अनेक छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमासाठी सर्व मिळून स्वच्छता मोहीम हाती घेत असतात. स्थानिक राजकारणीही या सोसायटीकडे दुर्लक्ष करत नाहीत. कारण एक अर्धा मतदारसंघच येथे राहात असल्याने त्याचे महत्त्व काही वेगळेच आहे. सोसायटीचे डिम्ड कन्व्हेअन्स झालेले नसून त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे लोखंडे सांगतात. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांत ही प्रक्रियाही पूर्ण होईल, असा विश्वास ते व्यक्त करतात. एकंदरीतच मानव पार्क नाव असले तरी गेल्या अठरा वर्षांतील काळात अनेक जुने रहिवासी जाऊन नवे आल्याने अनेक मतभेद आहेत. मात्र तरीही सोसायटीतील अनेक एकतावादी सदस्य सर्वाना एकत्र करून मानव पार्क खऱ्या अर्थाने मानवता संकुल करण्याच्या प्रयत्नात आहेत.

२६ जुलैनंतर अनेकांचे स्थलांतर

मुंबईसारख्या शहराला हादरवणाऱ्या २६ जुलैच्या पुराचा तडाखा मानव पार्कलाही मोठय़ा प्रमाणावर बसला होता. या पुरानंतर येथून अनेक रहिवाशांनी आपल्या सदनिका विकून अन्य ठिकाणी घरे घेतली. मात्र त्या काळातही एकमेकांना साहाय्य करून मानवतेचे उत्तम उदाहरण या सोसायटीतील रहिवाशांनी दाखवल्याचे दीपक पारूंडेकर सांगतात. २००५ नंतर येथे अनेक नवे सदनिकाधारक राहायला आले आहेत. अनेक मालक येथून स्थलांतरित झाले खरे, मात्र त्यांनी आपल्या सदनिकांत भाडोत्री ठेवले. त्यातील अनेक भाडेकरू आपुलकीने राहात नसल्याने जिव्हाळा कमी होत गेल्याचे येथील जुने जाणते लोक सांगतात. त्यामुळे सोसायटीत मतभेद वाढल्याचेही अनेक जण सांगतात.

Story img Loader