बदलापुरातील बेलवली परिसरातील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पाण्याने तुंबलेलेच आहे. या संदर्भात २१ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी भुयाराची पाहणी केली. या वेळी मुख्याधिकारी देविदास पवार, अभियंते देशमुख उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून भुयारी मार्ग बंद आहे. त्यामुळे बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच येथे असलेले रेल्वे फाटकही बंद करण्यात आले होते. याचा शाळकरी विद्यार्थी, रुग्ण तसेच येथे असलेल्या स्मशानात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत होता. रेल्वे व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवूनही त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नव्हती.
बेलवली परिसरातील प्रेतयात्रा पश्चिमेकडून पूर्वेकडे नेणारा एकमेव मार्ग बंद झाल्याने नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे या परिसरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे रेल्वेचे अभियंते देवेनकुमार यांनी या भुयाराची पाहणी केली; परंतु या अधिकाऱ्यांच्या भेटीचा कोणताही उपयोग झाला नसून ही समस्या सुटणे आता दुरापास्त झाले आहे.
याप्रश्नी आपली बाजू सावरण्यासाठी नगरपालिकेवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. या भुयारी मार्गाच्या बाजूने नैसर्गिक नाल्याचा स्रोत असून त्या नाल्याच्या पातळीच्या खाली मार्ग बांधल्याने भुयारी मार्गात पाणी शिरत आहे; तसेच रेल्वे हद्दीतून नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेची पाइपलाइन जाण्यास रेल्वेने गेल्या चार वर्षांपासून परवानगी न दिल्याने येथे सांडपाणी साठत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा