बदलापूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या आलोट गर्दीने आणि हुल्लडबाज तरुणांमुळे अनेकदा राडा झाल्याचे दिसून आले आहे. मात्र गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यावरून बदलापूर शहरात विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यात सध्या राडा सुरू असल्याचे दिसते आहे. गौतमी पाटील नाचवण्यापेक्षा कीर्तन महोत्सव करणारा आमदार हवा, असे वक्तव्य आमदार किसन कथोरे यांनी एका कार्यक्रमात किस्सा सांगताना केले होते. याचे वृत्त प्रसारित होताच काही तासातच वामन म्हात्रे यांनी वर्षभरापूर्वीच्या आगरी महोत्सव कार्यक्रमाची एक चित्रफीत प्रसारित केली. यात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात स्वतः आमदार किसन कथोरे उपस्थित असल्याचे दिसते आहे. त्यामुळे बदलापुरात शहरात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावरून दोन नेते भिडल्याचे चित्र आहे.
दिलं काही दिवसांपासून विधानसभा मतदारसंघातील बदलापूर शहरात भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपासून दोघे एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा एक किस्सा सांगितला. कथोरे म्हणाले की एका नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर प्रचार करत असताना प्रचाराचे भाषण संपल्यानंतर एक महिला येऊन भेटली. तिला काहीतरी बोलायचे होते. त्यामुळे तिला माइक देण्यात आला. तिने स्वतःच्या कुटुंबाची गोष्ट सांगितल्यानंतर आमदार कसा असावा याबाबत त्या महिलेने वक्तव्य केले . त्यावेळी ती महिला बोलताना म्हणाली की, गौतमी पाटील नाचवणारा नाही तर कीर्तन महोत्सव भरवणारा आमदार हवा, असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात बदलापूर शहरात आगरी महोत्सव दरम्यान गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कथोरे गेल्या काही दिवसांपासून ज्या वामन म्हात्रे यांच्यावर टीका करत आहेत त्याच वामन म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या आगरी महोत्सवात गौतमी पाटील आल्या होत्या.
हेही वाचा…ठाण्यात मारहाणीमुळे श्वानाचा डोळा निकामी, चौघांवर गुन्हा दाखल
आमदार कथोरे यांच्या टीकेनंतर म्हात्रे समर्थकांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यात काही वेळात खुद्द वामन म्हात्रे यांनी शहरातील एका व्हाट्सअप ग्रुपवर एक चित्रफीत प्रसारित केली. २०२३ वर्षात आयोजित आगरी महोत्सव कार्यक्रमात गौतमी पाटील यांचे नृत्य सुरू असताना समोर आमदार किसन कथोरे बसल्याचे या चित्रफितीतून दिसत होते. यावेळी चित्रफीत प्रसारित करताना म्हात्रे यांनी एक वक्तव्य केले. गेल्या वर्षी गौतमी पाटील हिचा नाच आवडला होता, यावर्षी खटकला. असे ते वक्तव्य होते. त्यामुळे वामन म्हात्रे यांनी किसन कथोरे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.
हेही वाचा… बदलापूर : आठवडी बाजार बंद करा, शहरातील भाजी विक्रेत्यांची पालिकेवर धडक
चित्रफीत कधीची
आगरी महोत्सवाचे आयोजन २०२३ या वर्षातही करण्यात आले होते. त्यावेळी आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात संवाद होता. त्यामुळे म्हात्रे यांनी कथोरे यांना या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पाचारण केले होते. त्यावेळी नृत्यांगना गौतमी पाटील यांचे नृत्य सुरू होते, असे त्या चित्रफितीत दिसते आहे.