पालिकेने बदलापूर (पूर्व) भागात तीन वर्षांपूर्वी बांधलेली भाजी मंडई अद्याप सुरू झालेली नाही. मंडईत भाजी विक्रेतेच बसत नसल्याने ती बंद असल्याचे समजते.
१३ ऑगस्ट २०११ला तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते मंडईचे उद्घाटन झाले. राज्य सरकारच्या वैशिष्टय़पूर्ण अनुदानातून उभारण्यात आलेल्या या इमारतीत तळ मजल्यावर साडेसात फूट बाय पाच फूट आकाराचे ३९ गाळे आहेत. पहिल्या मजल्यावर दोन हजार ९९२ फुटांचे सभागृह आहे. सर्व गाळे आणि सभागृह जाहीर लिलाव करून भाडे तत्त्वावर देण्यात येणार असल्याने १७ सप्टेंबर २०११ ला निविदा मागविण्यात आल्या. परंतु मात्र प्रथम कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या निविदा नंतर वर्षभर उघडण्यात आल्या नाहीत. याबाबत नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठवल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले.
पुढे निविदा उघडल्यानंतर, लिलाव पद्धतीप्रमाणे पालिकेला द्याव्या लागणाऱ्या गाळ्याच्या अनामत रकमेसाठी किमान २५ हजार रुपयांपेक्षा जास्त बोली लावणाऱ्या निविदाधारकास पालिका करारान्वये गाळा हस्तांतरित करणार होती. त्याप्रमाणे दीड लाखांपर्यंत बोली लावण्यात आली. यातील जास्त रक्कम लावणाऱ्यांना पालिकेने ३२ गाळे करारान्वये हस्तांतरित केले आणि उर्वरित सात गाळे तसेच पडून राहिले. त्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात आल्या. पण कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे पुन्हा या गाळ्यांसाठी निविदा निघणार आहेत. याउलट ३२ जणांना गाळ्यांचा ताबा मिळूनही त्यांनी भाजीचा व्यवसाय सुरू केलेला नाही.
नगरपालिकेने बांधलेली भाजी मंडई ही मोक्याच्या ठिकाणी नाही. त्यामुळे तेथे खरेदीसाठी ग्राहक येत नाहीत. उलट फुटपाथवर भाजी व्यवसाय जोरदार चालतो, अशीही चर्चा सुरू आहे. या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील २९९२ फुटांचे सभागृहही भाडय़ाने दिले गेले नसून त्याचे रूपांतर सध्या गोदामात झाले आहे. गाळे धारकांशी करार केल्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्यास येणे अपेक्षित आहे, मात्र अद्याप गाळेधारक आलेले नाहीत, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
संकेत सबनीस, बदलापूर

Story img Loader