बदलापूर : अंबरनाथ, उल्हासनगरसह बदलापूर नगरपालिकेच्या संयुक्त घनकचरा प्रकल्पाची उभारणी सुरू असताना नियोजीत जागेत खदाणीत स्फोट केले जात गेले. यात घरांना तडे जात असल्याचा आरोप आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संपातलेल्या काही व्यक्तींनी येथील एका यंत्राला आग लावल्याचे समोर आले आहे. मात्र या स्फोटाच्या माध्यमातून कचरा प्रकल्प लक्ष केले जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी यंत्राच्या जाळपोळप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची तयारी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने केली आहे.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन महापालिकांचा संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बदलापूरच्या कचराभूमीच्या जागेवर राबवला जातो आहे. या घनकचरा प्रकल्पामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या कचाट्यात सापडणाऱ्या अंबरनाथ आणि उल्हासनगर या पालिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या बदलापूरच्या कचराभूमीवर सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामात येथील खदाणीत स्फोट केले जात असल्याचा आरोप शेजारच्या गावातील ग्रामस्थांनी केला आहे. येथे साई आणि वालिवली ग्रामस्थांनी या स्फोटामुळे आमच्या घराला तडे जात असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे तातडीने हे स्फोट थांबवा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे.

ज्या ठिकाणी घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याबाबत कंपनीच्या वतीने ग्रामस्थांना प्रकल्पाच्या ठिकाणी नेत असा कुठलाही प्रकार सुरू नसल्याचे दाखवून दिले होते. मात्र त्यानंतरही काहींचे समाधान न झाल्याने मंगळवारी प्रकल्पाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका यंत्राला काही अज्ञातांनी आग लावल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांनी नागरिकांचा सभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पाच्या ठिकाणी सुरळीत काम सुरू असून गरज पडल्यास याठिकाणी पोलिस बंदोबस्तही दिला जाईल, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

कचरा प्रकल्प लक्ष्य

संयुक्त घनकचरा प्रकल्प हा स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रत्यक्ष जागेवर दगड फोडले जात आहेत. यासाठी नियंत्रित खोदकाम केले जात असून त्याप्रकारची यंत्रणा तेथे वापरली जात असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. खोदकामाच्या शेजारी उभे राहून कामगार काम करतात. त्यामुळे दूरवर घरांना तडे जाण्याचा प्रश्नच नाही असे कंपनीच्या वतीने सांगितले जाते आहे. तर विरोध म्हणून कंपनीची यंत्रणा जाळण्याचा प्रकार या शहरात पहिल्यांदाच झाला आहे. त्यामुळे यात प्रकल्पामुळे काही हितसंबंध दुखावले गेले की काय असा प्रश्न चर्चिला जातो आहे. दगड फोडण्यावरून काही हितसंबंध दुखावले गेलेत का अशाही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे खदाणीतील स्फोटांवरून कचरा प्रकल्प लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.