ठाणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमांचे आयोजन भिवंडी शहरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्रास नियमांचे उल्लंघन सुरू आहे. या कार्यक्रमाचे आयोजक रुद्रप्रताप त्रिपाठी यांच्याविरोधात ध्वनीप्रदूषण अधिनियमनांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत नारपोली पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून वांरवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या आयोजकांवर पोलीस कठोर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भिवंडी येथील हायवे दिवे भागात बागेश्वर धाम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमांचे आयोजन ५ ते ११ एप्रिल पर्यंत सुरू आहे. या कार्यक्रमात दररोज हजारो महिला-पुरुष सहभागी होत आहेत. येथे कथा वाचनाचे कार्यक्रम होतात. कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त असतो. या बंदोबस्ताचे देखरेख अधिकारी म्हणून भिवंडी परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डाॅ. मोहन दहीकर, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे म्हणून नियुक्त आहेत. येथे नारपोली पोलीस आणि इतर पोलीस बंदोबस्तासाठी नेमले आहेत. या कार्यक्रमात ध्वनी क्षेपक बसविण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत वाद्य वाजविण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्री उशीरापर्यंत येथे ध्वनी क्षेपक सुरु होते. त्यामुळे पोलिसांसमोरच सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन सुरु होते. गुरुवारी देखील अशाचप्रकारे कार्यक्रम सुरू करुन ध्वनी क्षेपक रात्री उशीरापर्यंत सुरु होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण झाले होते. पोलिसांनी ध्वनी मापक यंत्रणांद्वारे तपासणी केली असता, ध्वनीची तीव्रता अधिक होती. तसेच रात्री १२.१५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.

या प्रकरणात नारपोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५, ३७ (१), ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण) नियम २००० चे कलम ५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. यापूर्वी देखील आदेशाचे उल्लंघन झाले होते. या प्रकरणातही अशाच प्रकारे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नारपोली पोलीस ठाण्यात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनीच हे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे आयोजक रुद्रप्रताप त्रिपाठी याच्याविरोधात हे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून आता आयोजकावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.