कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडलेल्या कल्याणमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक उद्घाटन कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिल्याने, स्मारक उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्घाटनाची जय्यत तयारी केल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने शिवसेना नेत्यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे दोन दिवस धावाधाव करून सेना नेत्यांनी शासन, आयोगाकडून स्मारक उद्घाटन कार्यक्रमाला परवानगी मिळवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणमधील काळा तलावाच्या शेजारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा कल्याणमधील कल्याण काळा तलाव हा आवडीचा विषय होता. त्यांच्या रेटय़ामुळे काळा तलावाचे सुशोभीकरण पूर्ण झाले. बाळासाहेबांच्या आवडत्या ठिकाणी त्यांचे स्मारक असावे म्हणून पालिकेने काळा तलावा शेजारी त्यांचे स्मारक उभारले आहे. कोल्हापूरहून गेल्या आठवडय़ात बाळासाहेबांचा पुतळा वाजतगाजत आणण्यात आला. मुंबई, ठाणे, उल्हासनगर पालिकांमध्ये करून दाखविलेचा गजर करण्यासाठी सेनाप्रमुखांच्या स्मारकाचे उद्घाटन होणे सेना नेत्यांना आवश्यक वाटत होते. त्यामुळे घाईघाईने स्मारकाचे काम करून उद्घाटनाचा घाट सेनेच्या स्थानिक आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी घातला होता.

सेना थाटाने डामडौलात स्मारकाचे उद्घाटन व्हावे म्हणून प्रशासनाने ४८ लाख खर्चाची तयारी केली आहे. आचारसंहितेच्या कचाटय़ातून उद्घाटनाला मुभा द्यावी म्हणून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन स्मारक उद्घाटनाला परवानगी देण्याची मागणी केली होती.

उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. कार्यक्रम पत्रिका, मंडप अन्य तयारी पूर्ण करण्यात आली आहे, हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. सकाळपासून सेना नेते आयोगाकडून परवानगी मिळते की नाही म्हणून चिंतेत होते. अखेर आज संध्याकाळी उद्घाटन कार्यक्रमाला आयोगाने परवानगी दिली आहे.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal thackeray memorial to be built at mumbai mayors bungalow