अंबरनाथः ‘माझी हत्या झाली तरी चालेल. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही’, अशी एक खळबळजनक फेसबुक पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील आणि त्यांच्या जवळच्या अशा शिवसेना आमदाराने केली आहे. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी लिहलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. अंबरनाथ शहरातील विकास कामांवरून आमदार डॉ. किणीकर यांनी ही पोस्ट केली असून त्यांना नेमकी कसली भीती वाटते आहे, त्यांचे हे विधान शहरातील नेमक्या कोणत्या नेत्याविरुद्ध किंवा अधिकाऱ्याविरुद्ध आहे याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील एकमेव अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे एकमेव शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे आहेत. डॉ. किणीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जवळचे मानले जातात. त्यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर सोमवारी रात्री एक पोस्ट केली. त्या पोस्टवरून शहरात एकच खळबळ उडाली.
‘अंबरनाथमधील काही समाजकंटक पक्षाच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसेच अंबरनाथमध्ये होणाऱ्या विकास कामांच्या विरोधात काम करत आहेत. पण माझी हत्या झाली तरी चालेल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही व अंबरनाथ शहराचा सर्वांगीण विकास कधीच थांबू देणार नाही’, असे डॉ. किणीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षातले लोक करत आहेत. शिवसेनेच्या वतीने नुकतीच राज्यातल्या शंभरहून अधिक मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारी डॉ. किणीकर यांनी अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिकेत बैठका घेत विविध समस्यांवर चर्चा केली. त्यानंतर शहरातील रखडलेल्या प्रकल्पांवरही त्यांनी बोट ठेवले. त्यानंतर रात्री त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. डॉ. किणीकर यांचा रोख पक्षातील काही व्यक्तींकडे असल्याची चर्चा आहे. मात्र त्याचवेळी नेमके डॉ. किणीकर यांना काय म्हणायचे आहे हे कळू शकलेले नाही. त्यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
काही महिन्यांपूर्वी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले होते. त्यातही माझी हत्या झाली तरी चालेल, असा उल्लेख केला होता. त्यामुळे डॉ. किणीकर यांच्या या पुन्हा ठेवण्यात आलेल्या स्टेटसमुळे अनेक तर्कवितरक लावले जात आहेत.