उल्हासनगर: उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात एका रस्त्याच्या पाहणी दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हीनस चौक ते श्रीराम चौक या रस्त्याची पाहणी सुरू असताना विजय जोशी आणि वसंत भोईर यांच्या गटातील हा वाद उफाळून आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकारानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात माणेरे गाव परिसरात व्हीनस चौक ते श्रीराम चौक या रस्त्याच्या कामासाठी नुकताच १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी जागेची पाहणी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी एस. एस. टी. महाविद्यालयाच्या समोरच्या भागात असलेल्या नाल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. यात विजय जोशी, माजी नगरसेवक अरुण अशान आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नुकत्याच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आलेल्या माजी नगरसेविका विमल भोईर यांची महेंद्र आणि सुजित ही दोन मुले आली. त्यांच्यात आणि विजय जोशी यांच्यात नाला रुंदीकरणाच्या विषयावरून वाद झाल्याचे कळते आहे. या वादाचे पर्यावसन काही वेळात तुफान हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. यात दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले. या जोरदार राड्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात स्थानिक पातळीवर सारे काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे.