ठाणे  : ठाणे शहरातील बाळकुम पाडा नं २ या भागासह आसपासच्या परिसरात शुक्रवार रात्री १० वाजल्यापासून रोहित्र बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा बंद आहे. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, १५ तास उलटुनही वीज पुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच अनेकांच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.

ठाण्यातील बाळकुम परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता वीज वाहिनीत बिघाड झाला. या बिघाडाचा फटका बाळकुम पाडा नंबर दोनसह आसपासच्या परिसराला बसला. महावितरणचे सहकारी रात्रीपासून बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत करत आहेत. परंतु रोहित्र बिघाड झाल्याने वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागात नवीन रोहित्र बसविण्याचा निर्णय महावितरणाच्या वतीने  घेण्यात आला आहे. हे काम रात्री दहा वाजल्यापासून सुरू असले तरी अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. वीजपुरवठा बंद असल्याने परिसरातील रहिवासी अंधारात असून, घरगुती कामांपासून ते व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे वाढल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या तापमानामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. ठाण्यात अनेक नोकरदार विदेशातील कंपन्या, बँका आणि इतर कार्यालयांमध्ये भारतात राहून कामे करतात. असे नोकरदार ठाणे शहरात अधिक संख्येने आहेत. मात्र, वीजपुरवठा बंद झाल्याने त्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. महावितरणकडून तांत्रिक पथकाला कामाला लावण्यात आले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश आलेले नाही. प्रशासनाने लवकरात लवकर हा बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Story img Loader