‘आर्य गुरुकुल’ मधील घटनेनंतर पालकांची शाळा व्यवस्थापनांकडे मागणी

शाळा, रेल्वे स्थानक परिसर, जत्रांच्या परिसरात गॅस सिलिंडर घेऊन फुगे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फुगेवाल्यांना बंदी घालण्यात यावी. त्यानंतरही फुगेवाले व्यवसाय करताना आढळले तर त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कल्याण डोंबिवली परिसरातील पालकांनी शाळा व्यवस्थापनांकडे केली आहे.

कल्याणमधील आर्य गुरुकुल शाळेच्या क्रीडा दिवसानिमित्त फुग्यांच्या माध्यमातून गंमत करण्यासाठी फुगे विक्रेत्याला पाचारण करण्यात आले होते. फुगे भरत असताना सिलिंडरचा स्फोट होऊन राम यादव या फुगे विक्रेत्यासह बारा विद्यार्थी जखमी झाले आहेत. खेळ दिवस असताना शाळेने फुगे विक्रेत्याला आमंत्रित केलेच कसे, असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे. खेळण्यातील फुगे भरण्यासाठी गॅस सिलिंडर वापरायचा असेल, तर त्यासाठी कायदेशीर नियमावली आहे. हा सिलिंडर परवानाधारक मालकालाच गॅस गोदामातून भरून मिळतो. परंतु, अलीकडे काही वर्षांपूर्वी फुगे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मालकांकडे असे सिलिंडर आहेत. हे विक्रेते व्यवसाय करीत नसल्याने ते एखादा विक्रेता पकडून त्याला रोजंदारीवर सिलिंडर वापरण्यासाठी देतात. होणाऱ्या व्यवसायातून काही पैसे मूळ मालक घेतो. परंतु, बाहेर ज्याच्या ताब्यात सिलिंडर दिला आहे तो कशा प्रकारे सिलिंडर हाताळतो, त्याची देखभाल्ो करतो याची चाचपणी सिलिंडरचा मूळ मालक करीत नाही. विक्रेता हा सिलिंडरमधील गॅस फक्त फुग्यात भरायचा एवढाच विचार करून असतो. सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो, याचे ज्ञान या विक्रेत्याला नसते. या अज्ञानातूच गुरुवारचा स्फोट झाला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पालकांच्या शाळांना सूचना

आर्य गुरुकुल शाळेतील घटनेनंतर कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापक, व्यवस्थापनाशी संपर्क करून शाळेचे स्नेहसंमेलन, सार्वजनिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी फुगे विक्रेत्याला बोलावू नये. तसेच, शाळेच्या परिसरात फुगे विक्रेता आढळून आला असेल तर त्याला तेथून हुसकावून लावावे, अशी मागणी केली आहे. जत्रांमध्ये, रेल्वे स्थानक भागात असे फुगेवाले आढळून आले, तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामान्यांकडून करण्यात आली आहे.

फुगे विक्रीच्या गॅस सिलिंडरसाठी विशिष्ट टाकी असते. ही टाकी कंपनीतून बनविलेली असते. ही टाकी गॅससाठी वापरायची असेल, तर त्यासाठी शासन, पोलीस, अग्निशमन दल अशा विविध प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. परंतु, अलीकडे उपजीविकेचे साधन म्हणून भंगारातील साहित्य एकत्र करून ते वेल्डिंगच्या साहाय्याने जोडून टाकी तयार केली जाते. कार्बाइड टाकीत टाकून त्यात पाणी ओतले की, वाफ तयार होते. ही वाफ मग गॅस म्हणून वापरली जाते. परंतु, कार्बाइड व पाणी वापराचे प्रमाण असते, ते फुगे विक्रेता पाळत नाहीत. त्यातून स्फोटाच्या घटना घडतात. ठाणे जिल्ह्य़ात अशाप्रकारे फुगे विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. शाळेतील स्फोटामुळे पोलिसांनी या प्रकरणी जागरूक होणे आवश्यक आहे.

भाऊसाहेब चौधरी, उद्योजक

Story img Loader