लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्यानेच विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचवर प्रवाशांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात हिरव्या जाळीचे बांबूचे छत उभारले आहे. फलाट क्रमांक पाचचे अलीकडेच रूंदीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात या फलाटावर पावसाचे पाणी तुंबल्याने प्रवाशांना लोकलमध्ये चढ उतर करताना त्रास होत होता.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे विस्तारिकरण झाल्यानंतर समाधानाने प्रवास करता येईल, असे प्रवाशांना वाटले होते. विस्तारिकरण करण्यात आलेल्या फलाटाच्या भागावर पत्र्याचे छत नाही. त्यामुळे पहिल्याच मोसमी पावसाचे पाणी फलाटावर पडून साचले होते. फलाटावरील काँक्रीटचे बांधकाम नवीन असल्याने त्याच्यावर काँक्रीटच्या गारव्यासाठी घायपताच्या पाण्यात भिजवलेल्या गोण्या टाकण्यात आल्या होत्या. या गोण्यांमध्ये प्रवाशांचे पाय अडकून पडण्याचे प्रमाण वाढले होते.
आणखी वाचा-मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी आणखी वर्षभर, महामार्गाचे ६० टक्के काम पूर्ण
डोक्यावर छत नाही आणि पावसातून सुटका करून घेण्यासाठी घाईत फलाटावर उतरले तर गोण्यांमध्ये पाय अडकून प्रवासी पडत होते. या फलाटावर दोन्हीकडून प्रवाशांना त्रास होत होता. या त्रासाची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचवर विस्तारित फलाट क्रमांक पाचवर पत्र्याचा निवारा होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात हिरवी जाळी असलेले बांबूचे छत विस्तारित भागात लावून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
या बांबुच्या छतामुळे आता पावस किंवा उन्हापासून बचाव होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला तर मात्र बांबूच्या छतामधून पावसाच्या पाण्याची गळती होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली. बांबूचे छत लगतच्या लोखंडी सांगाड्यांना बांधून तयार करण्यात आले आहे. हे छत कोसळणार नाही याची दक्षता रेल्वेने घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत.