किशोर कोकणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : घोडबंदर घाटरस्ता खराब झाल्याने अवजड वाहनांना होणारे अपघात रोखण्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहतुकीला तीन महीने प्रवेशबंदी करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांकडे पाठविला आहे.        

मुंबई, गुजरात आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातील अवजड वाहतूकीसाठी घोडबंदर घाट रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र तो खराब झाल्याने अवजड वाहने उलटून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक शाखेची परवानगी मिळताच त्याच्या दुरुस्तीला सुरूवात होणार आहे. या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद केल्यानंतर भिवंडी शहर आणि मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी वाढण्याची भीती आहे. या रस्त्यावरून हलकी  वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा विचार सुरू आहे.

मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते. या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातील हलकी वाहनेही मोठय़ा प्रमाणात ये-जा करीत असतात. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट आणि चेना पूल परिसरातील रस्ता चढ-उताराचा आहे. हा रस्ता उंच-सखल झाल्याने वाहन उलटून अपघात होत आहेत. त्याचबरोबर चढणीच्या भागांत अनेक अवजड वाहने बंद पडतात. यामुळे या मार्गावर मोठी कोंडी होते. त्याचा परिणाम ठाणे शहरातील वाहतुकीवर होतो.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या नुतनीकरणाचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी पाठविला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. या कामासाठी नऊ कोटी ५० लाख खर्च येणार आहे.

रस्त्याची दुरुस्ती करताना चढ-उताराचा भाग कमी करून तो समांतर केला जाणार आहे. या रस्त्याच्या कामाच्या परवानगीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे वाहतूक पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. या कामाासाठी तीन महीने लागणार असून तोपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवावी, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना कळवले आहे. 

शहरातील वाहतुकीवर परिणामाची शक्यता

घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करून ती चिंचोटीमार्गे वळविण्यात येऊ शकतात. तर हलक्या वाहनांच्या एकेरी वाहतुकीस मुभा दिली जाऊ शकते. असे असले तरी हा मार्ग अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे एक वाहन बंद पडले तरीही तीन ते चार किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. रस्त्याचे काम सुरू झाल्यास त्याचा परिणाम शहरातील वाहतूकव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.