ठाणे : एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या मेट्रो निर्माणाच्या कामामुळे १९ ऑक्टोबर पर्यंत घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना रात्री ११:५५ ते पहाटे ४ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या वाहतूक बदलामुळे भिवंडी आणि मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीचा भार येणार असून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गरज असेल तरच कशेळी काल्हेर किंवा मुंबई नाशिक महामार्गाचा प्रवास करा. अन्यथा वाहन चालकांना अवजड वाहनांच्या कोंडीमध्ये अडकून राहावे लागण्याचा शक्यता आहे.
उरण जेएनपीटी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गावरून गुजराच्या दिशेने जात असतात. अवजड वाहनांना ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ६ यावेळेतच परवानगी असते. सध्या घोडबंदर मार्गावर मेट्रो चारच्या तुळई उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज १९ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११.५५ ते पहाटे ४ यावेळेत वाहतूक बदल या मार्गावर लागू असतील. या बंदचा परिणाम भिवंडी आणि मुंबई-नाशिक महामार्गावर होणार आहे.
हेही वाचा… अलिबाग : अवधुत तटकरे भाजपच्या वाटेवर ; आज पक्षप्रवेश होणार
असे आहेत बदल
प्रवेश बंद – मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग –
अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा कार्यालया जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड/अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
तर हलकी वाहने घोडबंदर मार्गावरून प्रवेश करू शकतात. तुळई उभारणीच्या ठिकाणी सेवा रस्त्यावरून ही वाहने वाहतूक करू शकतील.
गुजरातहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहतूकीवरही रविवारी परिणाम होणार आहे. रविवारी ११:५५ ते सोमवारी पहाटे ५ पर्यंत या वाहिनीवर बदल लागू असतील.
प्रवेश बंद – गुजरात येथून ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने येणा-या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
प्रवेश बंद – मुंबई, वसई, विरार येथून घोडबंदर रोडच्या दिशेने येणा-या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – गुजरात, मुंबई, विरार, वसई, येथून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची जड अवजड वाहने ही चिंचोटी नाका येथून कामण अंजुरफाटा – माणकोली भिवंडी मार्ग इच्छित स्थळी जातील.