बदलापूर: पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचा प्रघात गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. यंदाही अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध अशा कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात जाण्यास तहसीलदार यांच्या आदेशाने मनाई करण्यात आली आहे. याविरुद्ध नागरिकांत संताप असून आता स्थानिक आमदार किसन कथोरे यांनीही या बंदीला विरोध केला आहे. अशा ठिकाणी अपघात होत असतील तर ते रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे सांगत ही बंदी उठवण्यासाठी लवकरच निवेदन देणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पावसाळ्यात विविध ओढ, धबधबे जिवंत होत असतात. या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी मुंबई उपनगरतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या पर्यटनामुळे ठाणे जिल्ह्यात एक वेगळी स्थानिकांची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. मात्र या नैसर्गिक पर्यटन स्थळांवर झालेल्या काही अपघाताच्या घटनांनंतर खबरदारीचे उपाय योजन्याऐवजी जिल्हा प्रशासनाकडून या निसर्ग पर्यटन केंद्रांवर फिरण्यास थेट बंदी घातली जाते आहे. गेल्या चार वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यंदाही अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध अशा कोंडेश्वर धबधबा आणि बारवी धरण परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा पर्यटक या नैसर्गिक पर्यटन स्थळांवर जाण्यापासून वंचित राहणार आहेत. त्याचा थेट फटका येथील विक्रेते, शेतकरी यांना बसणार आहे. त्यामुळे अंबरनाथ तहसीलदारांनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होते आहे.
याच नाराजीत आता मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांचीही भर पडली आहे. अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर हे प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी अपघात होत असतील तर ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र अपघाताच्या नावाखाली सरसकट बंदी घालणे दुर्दैवी असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले आहे. निसर्गाचा आस्वाद घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध लवकरच वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे किसन कथोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदीच्या निर्णयाचा फेरविचार होतो का हे पाहणे महत्वाचे आहे.