लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा ठाणे महापालिका मुर्तीकारांना उपलब्ध करून देणार आहे. परंतु या मंडपांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मुर्ती विक्री करण्यास बंदी असणार आहे. तशी नियमावली पालिकेकडून तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीत मूर्तीकारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली.
या घोषणेनुसार मुर्तीकारांना जागेसाठी पालिकेकडे अर्ज करावे लागणार असून त्या अर्जांची छाननी करून पालिका परवानगी देणार आहे. त्यामुळे मुर्तीकारांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेकडून एक नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये महापालिकेची परवानगी मिळण्याआधीच मंडप उभारून मुर्ती तयार करताना किंवा विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच ठाणे महापालिकेने मुर्ती तयार करणे आणि विक्रीसाठी तात्परुत्या स्वरुपात मंडप उभारण्यास परवानगी दिलेल्या मंडपात पर्यावरण पुरक गणेशमुर्ती तयार करणे आणि विक्री करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या मंडपांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मुर्ती विक्री करण्यास बंदी घालण्याचा विचार पालिकेकडून करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.