नीरज राऊत

जलवाहिनीसाठी विकासकांकडून देणग्या; मात्र निधीचा गैरवापर

जलवाहिन्यांच्या सुधारणांसाठी बोईसर ग्रामपंचायतीने विकासकाकडून देणगीस्वरूपात निधी जमवला आणि नवीन बँक खाती उघडून त्यात जमा केला. मात्र ज्यासाठी निधी जमवला ती कामे झालीच नाहीत, पण या खात्यांतील सव्वा कोटी निधीचा परस्पर वापर करण्यात आला आहे.  या प्रकरणाची पालघरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून प्राथमिक अहवाल दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात आला असून दोषींवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बोईसर ग्रामपंचायतीने एमआयडीसीच्या पाणी देयकाची थकबाकी भरल्यानंतर बोईसरसाठी सहा इंचाची नवीन जलवाहिनी मंजूर झाली. खैराफाटक, धनानीनगरपासून भीमनगर यादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी २००७ मध्ये ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नव्हता. त्यावेळी प्रत्येक विकासकांकडून प्रती सदनिका अडीच हजार रुपये देणगी स्वरूपात घेऊन ही रक्कम वेगळ्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे ठरले. ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बोईसर शाखेत तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मे २००७मध्ये बँक खाते उघडले आणि त्यात निधी जमा केला.

जुलै २०१६मध्ये बोईसर ग्रामपंचायतीवर नवी कार्यकारिणी आणि त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या देणगी खात्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ठाणे जिल्हा सहकारी बँकेकडून याबाबत माहिती मागवण्यात आली. या देणगी खात्यामधून १०.५ लाख रुपये ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्याचे दिसून आले. या बँक खात्यामधून लाखो रुपयांच्या व्यवहार झाला असून यामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप बोईसरचे उपसरपंच राजेश करवीर यांनी केला.

यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम तक्रारीची चौकशी केली आणि त्याबाबतचा अहवाल पालघरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. विधिमंडळात या विषयी लक्षवेधी झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आणि पुन्हा चौकशी करण्यात आली. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर बँक व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बोईसर ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातील निधीच्या गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत अहवाल प्राप्त झाला असून संबंधितांवर दोषी अधिकारी- कर्मचारी यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येईल.

– मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.

बोईसर ग्रामपंचायतीच्या आधीच्या कार्यकारिणीत अनेक गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. एका प्रकरणामध्ये ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या बँक खात्यामधून १.२५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार डिसेंबर २०१७ मध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे केली असून त्यांनी अद्याप काही कारवाई केलेली नाही.

– राजेश करवीर, उपसरपंच, बोईसर.