शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना बँकेतील व्यवहार कळावेत. बचतीची गोडी लागावी. त्याच बरोबर विद्यार्थ्यांमध्ये अर्थसाक्षरता निर्माण व्हावी आणि अर्थभान यावे या उद्देशातून डोंबिवलीतील जान्हवीज मल्टी फाऊंडेशन संस्थेच्या येथील जुनी डोंबिवलीतील जन गण मन शाळेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेच्या सहकार्याने एक बँक सुरू केली आहे. या बँकेला युनियन बँकेच्या डोंबिवली शाखेने सहकार्य केले आहे.
हेही वाचा- कल्याण-डोंबिवली वाहतूक विभागाची मोहीम; रात्रीच्या विशेष वाहन तपासणी मोहिमेत ५० तळीरामांवर कारवाई
जान्हवीज मल्टी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. राजकुमार कोल्हे, सचिव डाॅ. प्रेरणा कोल्हे, संचालिका जान्हवी कोल्हे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. युनियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक, डोंबिवली शाखेचे मुख्य व्यवस्थापक व्यवस्थापक अवनिश कुमार यांनी या उपक्रमाला पूर्ण सहकार्य देण्याची तयारी दर्शविली आहे. ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले रंगमंदिरात बँकेच्या शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे.
शाळेत सुरू झालेली ही देशातील पहिली बँक असण्याचा अंदाज संस्थापक कोल्हे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकला मद्यपी, श्वानांचा विळखा
विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन नोकरी, व्यवसाय सुरू करतात. काही परदेशी जाण्याची स्वप्ने पाहतात. त्यांना शालेय जीवनापासून बँक म्हणजे काय याविषयी प्रत्यक्ष कृतीने कोणी काही शिकवलेले नसते. त्यामुळे असे विद्यार्थी वेळ येते तेव्हा गोंधळून जातात. पदवीधर विद्यार्थ्यांना धनादेश कसा लिहायचा, बेअरर धनादेश, पैसे बँकेत भरणे, काढणे आणि त्यासंबंधीच्या पावत्या कशा भरायच्या याची कोणतीही माहिती नसते. विद्यार्थी क्रमिक अभ्यासक्रमात हुशार असला तरी तो अशा व्यवहारात अनेक वेळा मागे असल्याचे दिसतो. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील ज्ञान शालेय जीवनापासून असावे म्हणून जन गण मन शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने जेएमएफ चिल्ड्रन स्माॅल सेव्हिंग बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना बँक म्हणजे काय, तेथील व्यवहार याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांमधून बँकेचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी, साहाय्यक, लिपिक, मार्गदर्शक अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या माळेवर ही बँक विद्यार्थी चालविणार आहेत, असे डाॅ. कोल्हे यांनी सांगितले.
हेही वाचा- अंबरनाथः दोन कार अपघातात एकाचा मृत्यू एका चालकाची डुलकी, तर दुसऱ्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात
आठवड्यातून दोन दिवस कामकाज
अभ्यास, तासिका महत्वाच्या असल्याने आठवड्यातून दोन दिवस ही बँक सुरू ठेवली जाईल. पाचवी ते पदवीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येकी दोन विद्यार्थी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनी बँकेत जमा करण्यासाठीची आणलेली रक्कम जमाकर्ता विद्यार्थ्यांजवळ देतील. ही रक्कम विद्यार्थ्याच्या बँकेच्या खात्यात जमा केली जाईल. शाळेत एकूण तीन हजार ५०० विद्यार्थी आहेत. बचत खाते उघडताना विद्यार्थ्यांकडून खात्यात ५०० किंवा तत्सम ठेव रकमेचे बंधन असणार नाही. शून्य ठेवीतून ही खाती बँक उघडून देईल, असे युनियन बँकेचे मुख्य व्यवस्थाक कुमार यांनी सांगितले. २० रुपयांपासून बँकेत रक्कम स्वीकारली जाईल. विद्यार्थ्याला पासबुक दिले जाईल. शाळेच्या बँकेतील रक्कम युनियन बँकेचा कर्मचारी जमा करुन विद्यार्थ्यांच्या युनियन बँकेतील शाखेत भरणा करण्यासाठी नेईल. विद्यार्थी आपल्या पालकांच्या साहाय्याने बँकेतील खाते हाताळू शकणार आहेत, असे डाॅ. कोल्हे यांनी सांगितले.
पालक मुलांना शाळेत येताना, नातेवाईक खाऊसाठी पैसे देतात. या पैशातून बचत करण्याची सवय मुलांना लागावी हाही शाळेत बँक सुरू करण्याचा उद्देश आहे, असे प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. दर दोन महिन्यांनी नवीन मुलांना बँकेत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. बँकेचा व्यवसाय वाढला तर शाळेतच एटीएम सुविधेचा विचार आहे.
“ क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर मुलांना आपण अर्थसाक्षर करू शकलो याचा आनंद या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. आताच्या डिजिटल युगात अभ्यासाबरोबर मुले अर्थभान असणारी असली पाहिजेत. बचतीची गोडी मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा शाळेत बँक सुरू करण्याचा उद्देश आहे. लवकरच शेअर बाजाराची सुविधाही शाळेत उपलब्ध करुन देऊन विद्यार्थ्यांना त्यात प्रवीण करण्याचा विचार आहे, अशी माहिती डोंबिवलीतील जन गण मन विद्यालयाचे अध्यक्ष डाॅ. राजकुमार कोल्हे यांनी दिली.