लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला आहे. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली. तसेच शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले. शाखा जमीनदोस्त केल्याने शनिवारी उद्धव ठाकरे मुंब्रा शहरात येणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा आणि रेतीबंदर परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाची चिन्ह असून शहरात हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

मुंब्रा शहरात २००१ मध्ये रुंदीकरणानंतर शंकर मंदिर परिसरात शिवसेनेची मध्यवर्ती शाखा सुरू झाली होती. मुंब्रा शहरातील शिवसेनेची ही सर्वात जुनी शाखा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेत ठाकरे गटाचे पदाधिकारी बसत होते. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेत असतानाही शिंदे समर्थक त्याठिकाणी आले. शाखेतील पदाधिकारी बाहेर निघाल्यानंतर त्यांनी ही शाखा जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तर या ठिकाणी शाखेची पुनर्बांधणी केली असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.

आणखी वाचा-ठाणे : दिवाळीत बाजारपेठेत होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलीस सज्ज

त्यातच आता उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्रा शहरात शाखेच्या ठिकाणी भेट द्यायला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कळवा – मुंब्रा येथील आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर उभारले आहेत. बॅनरवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे छायाचित्र आहे. हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banner by jitendra avhad to welcome uddhav thackeray mrj
Show comments