ठाणे : मागील दोन दिवसांपासून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत विविध राजकीय चर्चा रंगल्या असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाचे बॅनर झळकत आहेत. ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याने हे बॅनर उभारले असून या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे तसेच ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी देखील ठाकरे बंधूंनी एकत्र यावेत असे ट्वीट एक्स या समाजमाध्यमावर केले आहे.
‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्त्वासमोर आमची भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहणे, यात काही कठीण आहे, असे वाटत नाही’ असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब वाहिनीवरील ‘वास्तव मे ट्रुथ’ या पाॅडकास्ट कार्यक्रमात केले. यास शनिवारी उद्धव ठाकरे यांनीही साद दिली. यानंतर संपूर्ण दिवसभर ठाकरे बंधू एकत्र येणार का, याच्या चर्चा समाजमाध्यमांवर रंगू लागल्या आहेत.
ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करत आहेत. या छायाचित्रांमध्ये शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील दिसत आहेत. एका छायाचित्रात बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेऊन छायाचित्र काढले आहे. हे छायाचित्र प्रचंड प्रसिद्ध झाले होते.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत आहेत. तर काही पदाधिकारी अद्यापही ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातील ठाकरे गटाचे पडवळनगर येथील शाखाप्रमुख बबन गावडे यांनी पडवळनगर भागात दोन्ही ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यासाठी बॅनर उभारले आहेत. ‘महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र’ असा मजकूर या बॅनरवर आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांनी उद्धव आणि राज यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. याबाबत गावडे यांना विचारले असता, ते म्हणाले की, सध्या मराठी माणसांवर अन्याय होत आहे. दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यास नक्की फरक पडेल असे ते म्हणाले.
केदार दिघे यांचेही ट्वीट
ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही अशीच भावना व्यक्त केली. त्यांनी एक्स माध्यमावर एक ट्वीट प्रसारित केले आहे. यात म्हटले आहे की, ‘उद्धव साहेब आणि राज साहेब हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच झाल्यास त्याचा निर्णय दोन्ही बंधू घेतील. राज आणि उद्धव साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकली असताना अन्य नेत्यांनी भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेऊन टिकाटिपणी करु नये’ असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.