बडय़ा ग्राहकांना धरून ठेवण्यासाठी अजब ‘औदार्य’
मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्यापासून वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवल्या जाऊ लागल्या आहेत. एकीकडे नियमित ग्राहकांना घरी पोहोचवण्यासाठी बारमालकांकडून वाहनचालक पुरवले जात असल्याचे उघड झाले असतानाच काही ठिकाणी मद्यपी वाहनचालकांना आकारण्यात येणारा दंड बारमालकांकडून भरण्यात येत असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. बडय़ा आणि नियमित ग्राहकांना आपल्याकडे धरून ठेवण्याच्या बारमालकांच्या या ‘औदार्या’मुळे पोलीसही चक्रावले आहेत.
मद्य प्राशन करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येते. गेल्या तीन महिन्यात सव्वा तीन हजार मद्यपी चालक वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर बारमधून मद्य प्राशन करून निघालेला ग्राहक स्वत: वाहन चालवणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना बारमालकांनाही करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या नोटिशीनंतर धास्तावलेल्या बारमालकांनी अशा ग्राहकांना घरी पोहोचवण्यासाठी वाहन किंवा चालकाची सुविधा पुरवण्यास सुरुवात केली.
असे असतानाच, पोलिसांनी आता बारच्या परिसरातच मद्यपींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. दारू पिऊन येणाऱ्या व्यक्तीने वाहन चालवण्याचा प्रयत्न करताच त्याला रोखण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. अशा कारवाईने बारची बदनामी होण्याच्या भीतीने काही ठिकाणी बारमालकांकडूनच मद्यपी वाहनचालकांचा दंड भरण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. वर्तकनगर तसेच कापुरबावडी या परिसरात मद्यपी चालकांविरोधातील कारवाईदरम्यान तीन ते चार वेळा असा प्रकार निदर्शनास आल्याची माहितीही त्या अधिकाऱ्याने दिली आहे.