पोई, तालुका- कल्याण 

गावातील पारंपरिक शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करून शहरातील नोकरीच्या मागे धावणे ही ठाणे जिल्ह्य़ातील बहुतेक गावांची मानसिकता. पोई गाव मात्र त्याला अपवाद आहे. कल्याणसारखे शहर जवळ असूनही येथील ग्रामस्थांनी आपल्या उत्पन्नाचे आणि उत्कर्षांचे स्रोत गावातच शोधले. त्यामुळेच जिल्ह्य़ातील एक आदर्श गाव म्हणून सध्या पोई ओळखले जाते.

सद्विचारी, अध्यात्म्याच्या वाटेने चालणारे लोक एकत्र राहात असतील तर गावाचा कसा सर्वागीण विकास होतो. गाव कसे काळानुरूप बदलत आपले रुपडे पालटते याची प्रत्यक्ष अनुभूती पोई गावाच्या विकासातून दिसून येते. कल्याण तालुक्यातील २१४ उंबरे आणि दीड हजार लोकवस्तीचे बारवी नदीकाठचे हे टुमदार गाव. कल्याणपासून बसने एक तास आणि खासगी वाहनाने अध्र्या तासात या गावात पोहोचता येते. कल्याण- मुरबाड रस्त्यावर गोवेली गावाच्या अलीकडे उजवे वळण घेतले की लहान लहान टेकडय़ांमधून गर्द झाडीतून वळणे घेत गाडी अरुंद खड्डेविरहित रस्त्यावरून पोई गावाच्या दिशेने धावू लागते. अवघ्या पंधरा मिनिटांत पोई गावात आपण पोहचतो. गावच्या प्रवेशद्वारावर गावचे मंदिर आणि प्राथमिक शाळा आपले स्वागत करते. यापूर्वीचा विचार केला तर तसे हे दुर्गम भागातील गाव. कारण तेव्हा येथील ग्रामस्थांना बससाठी अर्धा ते एक तासाची पायपीट करीत यापूर्वी कल्याण मुरबाड रस्त्यावर येऊन वाहनाने पुढचा प्रवास करावा लागत होता. गाव परिसरात हायस्कूलची सुविधा नसल्याने रानातील आडवाटेने पायी प्रवासी करीत विद्यार्थी रायता, कल्याण येथे शिक्षणासाठी जायचे. गावात मातीचे रस्ते. धूर सोडणाऱ्या स्वयंपाकाच्या चुली. अशा पारंपारिक पद्धतीने गावाची वाटचाल सुरू होती. मात्र पुढे काळ बदलत गेला. गावात नोकरदार, चाकरमानी वाढले. कष्ट करून दोन पैसे गाठीला ठेवण्याची धडपड वाढू लागली. गावातील घराघरांतील मुले शिकू लागली. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने घराघरांत मेहनतीचा पैसा खुळखुळू लागला. काळाबरोबर पोई गावानेही आपले पारंपरिक रूप पालटले.

गावात शिक्षणाची सुविधा झाली. नोकरदारीमुळे पैसा आला. शहर फिरून पुन्हा गावात येणारे रहिवासी आपलेही गाव आता विकासाच्या वाटेवर नेले पाहिजे म्हणून विचार करूलागले. राष्ट्रीय कीर्तनकार हिराजी बुटेरे पोईगावचे. कीर्तनातून गावोगावी प्रबोधन करता करता गावातही त्यांनी सद्विचार रुजविला. गावचे सरपंच झाल्यानंतर हिराजी बुटेरे यांनी गावाचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले. ‘एक गाव एक पाणवठा’ या न्यायाने गावातील विहिरी दलितांसाठी खुल्या करण्यात हिराजी महाराजांचे महत्त्वपूर्ण योगदान. गावाला लागून कातकरी वाडी आहे. त्यांनाही गावाच्या विकासात सामावून घेतले. हा वर्गही सज्ञान होऊन स्वसामर्थ्यांने, कष्टाने कुटुंबाची उपजीविका करू लागला. गावातील प्रत्येक घरातील माणूस वारकरी संप्रदायातील. त्यात गावात प्रबोधनाची, समाजकारणाची वाहती गंगा सुरूच. या प्रवाहाचा आधार घेत गावाने टप्प्याने आपला विकास केला आहे.

सोळाशे एकरची वनसंपदा

पोई गावाला लागून वन विभागाची सुमारे सोळाशे एकर जमीन आहे. घनदाट वृक्षसंपदेने सजलेले हे जंगल सुरुवातीच्या काळात ग्रामस्थांना चुलीसाठी लाकूड फाटा देण्याचे साधन होते. पंचक्रोशीतील लाकूड चोर जंगलात येऊन झाडे तोडून जंगलांची कत्तल करीत असत. वृक्ष हे आपले सोबती आहेत. त्यांचे संवर्धन करणे हे आपले काम आहे, हा विचार तत्कालीन सरपंच व कीर्तनकार हिराजी बुटेरे यांनी ग्रामस्थांसमोर मांडला. वन विभागात नोकरीत असलेले ग्रामस्थ हरिश्चंद्र सांबरे यांनी वने कापून त्यांचा नाश करण्यापेक्षा आपण त्याचे संवर्धन केले तर गावाच्या वैभवात भर पडेल आणि राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन केल्याचे मोठे काम गावाकडून होईल, असे मत व्यक्त केले. बाळाराम बुटेरे, काळुराम झाटे यांनी बुटेरे, सांबरे यांची संकल्पना उचलून ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यात वन विभागाच्या सोळाशे एकरच्या जंगलात कुऱ्हाड, कोयता चालवायचा नाही. चरण्यासाठी गुरे न्यायची नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. अठरा र्वष वनराईत कोणीही ग्रामस्थ पाऊल ठेवत नसल्याने पोई गावच्या कुशीत निबीड अरण्य फुलले आहे. ग्रामस्थांची या यशस्वी उपक्रमाला शासनाचा ‘संत वनग्राम’ पुरस्कार मिळाला आहे. शासन झाडे लावण्याचा निर्णय आता घेत आहे. मात्र पोई गावाने झाडे लावणे आणि संवर्धनाचा विचार अठरा वर्षांपूर्वी केला.

गावात कुणबी-मराठा, दलित, कातकरी समाजाची वस्ती आहे. पिढीजाद चालत आलेला शेती हा गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. मजुरीचे चढे दर, मजुरांचा तुटवडा त्यामुळे अनेक ग्रामस्थ कुटुंबांच्या हिमतीने जमेल तेवढी शेती लावतात. तरुण वर्ग शेतीकडे वळत नसल्याने जुनी मंडळी आपल्या ऐपतीप्रमाणे शेती कसतात. कष्ट, शेतीकाम अंगात मुरले असल्याने जुनी ज्येष्ठ मंडळी आनंदाने शेतीची कामे करतात. पोई गावच्या वेशीवरून बारवी नदी वाहते. नदी बारमाही असल्याने दिवाळीनंतर नदीच्या पाण्यावर गावकरी भेंडी व इतर भाजीपाला लागवड करतात. नोव्हेंबरपासून सुरूहोणारा भेंडी-भाजीपाल्याचा हंगाम अगदी एप्रिल-मेपर्यंत चालतो. गावातील भेंडी कल्याण बाजार आणि काही भेंडी परदेशात पाठविली जाते. गावात नळपाणी पुरवठा योजना आहे. २४ तास पाणी आहे. नदीच्या पाण्यावर जलसिंचन योजना घेण्यात आल्या आहेत. व्यक्तिगत आणि सामूहिक पद्धतीने जलसिंचन योजना राबविण्यात येत असल्याने गाव परिसरातील ७५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. गावातील प्रत्येक कुटुंब वर्षभर कष्ट करून आपल्या हातांना राबवीत असते. यामुळे दोन पैसे गाठीला लागतात. गावात १४ महिला बचत गट लहान मोठे हस्तोद्योग करतात. दोन पैसे कमवितात. त्यामुळे गावातील प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळाले आहे. घरातील चूल सांभाळून स्त्रिया महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रमात सक्रिय आहेत. गावात पैसा खुळखुळायला लागला; मग तो घरात किती दिवस ठेवायचा. असा प्रश्न निर्माण झाल्याने गावातील उपक्रमशील शिक्षक आणि शेतकरी गुरुनाथ सांबरे यांच्या प्रयत्नांतून गावात बँक ऑफ महाराष्ट्रची एक खिडकी शाखा सुरू झाली आहे. गावकऱ्यांचे सगळे आर्थिक व्यवहार या बँकेतून केले जातात. शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय अनुदान, महिला बचत गटांची खाती बँकेच्या या शाखेतून हाताळली जातात. गुरुनाथ सांबरे हा सगळा व्यवहार पाहतात. गुरुनाथ सांबरे हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिक्षक. मात्र आता नोकरी सोडून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत विविध प्रयोग केले. चांगल्या व्यावसायिक झाडांची लागवड केली, सेंद्रिय शेतीचे प्रयोग त्यांनी सुरू केले आहेत. त्यात त्यांना चांगले यशही मिळत आहे.

गावात म्हशीपालन करून दुग्धव्यवसाय केला जातो. त्यासाठी १६ लाखांचे अनुदान त्यासाठी मिळाले आहे. मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय गावात केला जातो. गावातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामात सतत व्यग्र असते. अशा प्रकारे गावाची व्यावसायिक वीण घट्ट बांधण्यात आली आहे. वीस वर्षांपासून गावात दारूबंदी आहे. त्यामुळे भांडण आणि तंटामुक्त गावाचा तुरा गावाच्या शिरपेचात आहे. प्रत्येक घरात गॅस सिलेंडर असल्याने चुलीसाठी लाकूडतोड हा प्रकार बंद आहे. पाच ठिकाणी गोबर गॅस प्लॅन्ट आहेत. लहानशा टुमदार उंचवटय़ावर बसलेल्या पोई गावातील आखीव स्वच्छ रस्ते. कौलारू, टुमदार घरे, पण काही घरांना बाहेरून बंगल्यांचा साज. घरासमोर तुळशी वृंदावन. घराच्या पाठीमागील पडवीत चुलीवरची रसरशीत भाजी आणि फोफडा आलेली भाकरी खाण्याची पूर्वीपासून सवय असल्याने खास चुलीची रचना गावात पाहण्यास मिळते. गावात सतत नवीन काही झाले पाहिजे, आले पाहिजे, शासनाच्या सुविधांचा लाभ ग्रामस्थांनी घेतला पाहिजेत म्हणून नवतेचा ध्यास घेतलेले आणखी एक शिक्षक म्हणजे रवींद्र घोडविंदे. गावासाठी रस्ते, पाणी, कृषीविषयक योजनांचा निधी गावात अधिक प्रमाणात येईल यासाठी घोडविंदे यांचे सतत प्रयत्न असतात. योजना गावकऱ्यांच्या हातात सोपवल्या की त्याची अंमलबजावणी गावकरी करतात. महिला बचत गटांनी लहान उपक्रमात अडकून न पडता मोठय़ा व्यवसायात पाऊल टाकले पाहिजे म्हणून बचत गटाने साडेसात लाख रुपये मोजून भात पेरणी, लागवड आणि कापणी यंत्र आणले आहे. शाळेतील मुलांना माध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम बचत गट करतात. बचत गटाच्या अध्यक्षा अंजना बुटेरे, सचिव लता बुटेरे बचत गटांचे नियंत्रण करतात. सरपंच दयानंद झाटे, उपसरपंच वैशाली बुटेरे ही तरुण गटातील मंडळी ज्येष्ठांच्या सल्ल्याने गावचा कारभार करतात. गाव हागणदारीमुक्त आहे. वर्षांतून एकदा गावात अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. सात दिवस गावाला संतग्रामाचे रूप येते. सामुदायिक विवाह सोहळ्यांचे उपक्रम राबविले जातात. गावात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न ठेवता, ज्या घरातील एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल त्या घरी प्रत्येक ग्रामस्थाने एक पायली तांदूळ आणि ऐपतीप्रमाणे पैसे नेऊन देण्याची पद्धत आहे. ३५ वर्षांपासून सुरूअसलेली प्रथा आजही पाळली जाते. बारा बलुतेदारांची वस्ती गावात असली तरी एक गाव म्हणून एक दिलाने प्रत्येक ग्रामस्थ गावात राहतो. गावात प्राथमिक शाळा आहे. आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. गावातून राज्य परिवहन मंडळाच्या बस, खासगी वाहनांची बाहेरगावी जाण्यासाठी सुविधा आहे. गावचा सर्वागीण विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने पोई गावाला शासनाचा ग्राम स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला आहे. असे हे बारवी नदीच्या काठावरील बालगोपाळांपासून ते थोराडापर्यंतचे गोकुळ चांगुलपणाचे धडे गिरवीत पोई गावाला विकासाच्या वाटेवर नेत आहे.

Story img Loader