पुनर्वसनास विलंब; ८६ घरांच्या जागेत आता २०५ घरे

बारवी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असताना आता त्यांच्या घरांसाठी निश्चित करण्यात आलेले क्षेत्रफळही कमी केल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. २००४ च्या सर्वेक्षणानंतर ज्या ८६ आदिवासींना गावठाण २ मधील जागेत घरे मिळणार होती. त्याच जागेत आता तब्बल २०५ कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे घरांचे क्षेत्रफळ कमी होऊन नुकसान होणार आहे.

आदिवासींना मिळणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ पूर्वीच्या तुलनेत कमी होणार असून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घरांसंदर्भात दिलेला शब्द पाळला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

बारवी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २००४ मध्ये काचकोली येथील चार पाडय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी ८६ घरांचे सर्वेक्षण झाले. मात्र त्यानंतर १३ वर्षे यात काहीही प्रगती झाली नाही. २००४ च्या सर्वेक्षणानंतरही आणखी दोन वेळा सर्वेक्षण झाले. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरांची संख्या वाढल्याचे २०१२ च्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले.

पुनर्वसनासाठी निश्चित करण्यात आलेली जागा मात्र तेवढीच ठेवण्यात आली. त्यामुळे आता ८६ घरांच्या जागेत २०५ घरे बांधली जाणार आहेत. आदिवासींचा याला विरोध आहे.

पुनर्वसनाचा नव्याने विचार करा

शेतीचे साहित्य, गुरे, पाळीव प्राणी यांना ठेवण्यासाठी जागा आवश्यक आहे. दोन गुंठे जमिनीतील घरात हे सारे मावणार नाही. एमआयडीसीने याचा विचार करूनच जागा द्यावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. पूर्वी ज्या ८६ घरांचे गावठाण २ मध्ये पुनर्वसन केले जाणार आहे, त्याच जागेत तितक्याच कुटुंबांचे स्थलांतर करावे आणि नव्याने भर पडलेल्या घरांसाठी दुसऱ्या जागेचा विचार करावा, अशी आदिवासींची मागणी आहे.